विलेपार्ले स्थानक परिसर होणार रुंद; सांताक्रूझमधील अतिक्रमणे हटवणार, अश्विनी भिडेंचे 'पादचारी प्रथम'अभियानांतर्गत निर्देश 
मुंबई

विलेपार्ले स्थानक परिसर होणार रुंद; सांताक्रूझमधील अतिक्रमणे हटवणार, अश्विनी भिडेंचे 'पादचारी प्रथम'अभियानांतर्गत निर्देश

मुंबईतील पादचाऱ्यांना सुरक्षितपणे आणि अडथळ्यांविना चालता यावे, यासाठी विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ रुंद करण्यासह सांताक्रुझ पश्चिम परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पादचाऱ्यांना सुरक्षितपणे आणि अडथळ्यांविना चालता यावे, यासाठी विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ रुंद करण्यासह सांताक्रुझ पश्चिम परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत बुधवारी केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी पदपथ, रस्त्यांची स्वच्छता, कचरा संकलन व्यवस्था आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.

विलेपार्ले स्थानक परिसरात पादचाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पदपथ रुंद करण्यावर भर देण्यात येणार आहे. एच पूर्व विभागातील वाकोला जंक्शन ते सांताक्रुझ रेल्वे स्थानकादरम्यानचा रस्ता ३६.६० मीटर रुंदीच्या मंजूर रेषेनुसार विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लगतच्या मालमत्तांची खुली जागा संपादित करण्याच्या दृष्टीने २८ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील ८९ परवानाधारक गाळे जवळच्या परिसरात स्थलांतरित करण्यात येणार असून, २१ अनधिकृत गाळे यापूर्वीच हटवण्यात आले आहेत. या पाहणी दौऱ्याला संबंधित परिमंडळांचे उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तसेच जी दक्षिण, एच पश्चिम, एच पूर्व आणि के दक्षिण विभागांचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

गाळे स्थलांतरित करणार

सांताक्रुझ पश्चिम येथील टिळक मार्ग आणि एम. जी. मार्गावरील पदपथांची पाहणी करताना आयुक्तांनी अतिक्रमणे हटवून पदपथ मोकळे करण्याचे निर्देश दिले तसेच स्कायवॉकवरून लोंबकळणाऱ्या केबल्स काढून टाकण्यासह दुभाजकांची नियमित स्वच्छता राखण्यास सांगितले. देसाई मार्गावरील ८६ अधिकृत गाळे, महात्मा गांधी मार्गावरील ८२ गाळे, ५० भाजीविक्रेत्यांचे गाळे आणि टिळक मार्गावरील १४ गाळे स्थलांतरित करण्याचे निर्देशही दिले.

प्रसूतीगृहातील सुविधांची तपासणी

दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी डॉ. व्ही. एन. शिरोडकर प्रसूतिगृहाला भेट देऊन औषधसाठा, उपलब्ध सोयीसुविधा आणि नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या तयारीची पाहणी केली. हा विभाग लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. रुग्णांच्या उपचारांची माहिती, औषधसाठ्याची नोंद आणि व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणालीची कार्यपद्धतीही त्यांनी जाणून घेतली.

वाहनांखाली साचणारा कचरा उचलणार

‘पादचारी प्रथम’ अभियान आणि कचरा साचण्याची संवेदनशील ठिकाणे निर्मूलन मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तांनी वरळीतील आदर्शनगर मार्ग, सेनापती बापट मार्गावरील जी. एल. लोडर चौकी तसेच पश्चिम उपनगरांतील विविध ठिकाणांची पाहणी केली. वरळीतील पदपथांची स्थिती सुधारण्यासह रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांखाली साचणारा कचरा नियमितपणे साफ उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर होणार कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विहिरी, बोअरवेलने गाठला तळ; ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती

... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर