"कचरा का टाकला?" म्हणणाऱ्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; विरारमध्ये महिला गोविंदा पथकाचा राडा, Video व्हायरल सीसीटीव्ही व्हिडीओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
मुंबई

"कचरा का टाकला?" म्हणणाऱ्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; विरारमध्ये महिला गोविंदा पथकाचा राडा, Video

विरार पश्चिमेतील वटार परिसरात कचरा फेकण्याच्या कारणावरून महिला गोविंदा पथक आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. मारहाणीत एक कर्मचारी जखमी झाला असून, घटनेचा CCTV व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mayuri Gawade

विरार : "इथे कचरा का टाकला?" या कारणावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यवसान थेट हाणामारीत झाल्याची घटना रविवारी (दि. ०६) विरार पश्चिमेतील वटार परिसरात घडली. दहीहंडीनंतर सहलीसाठी नवापूरला गेलेल्या मुंबईतील एका महिला गोविंदा पथकाच्या सदस्यांचा मनवेल पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. त्यानंतर एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने तो जखमी झाला. या संपूर्ण प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिस्कीटचं पाकीट फेकल्याने वाद

शनिवारी दहीहंडी उत्सव पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित महिला गोविंदा पथक लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसह नवापूर येथील राजहंस रिसॉर्टमध्ये सहलीसाठी गेलं होतं. दिवसभराचा कार्यक्रम आटोपून रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता ते मुंबईच्या दिशेने परतत होते.

वटार येथील मनवेल पेट्रोल पंपावर बसमध्ये डिझेल भरण्यासाठी ते थांबले. यावेळी बसमधील एका मुलाने बिस्कीटचं रिकामं पाकीट बाहेर फेकलं. त्यावर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने आक्षेप घेत, "आम्ही इथे काम करतो. अशा प्रकारे कचरा फेकू नका," असं सांगत कचरा उचलण्यास सांगितलं. याच मुद्द्यावरून बसमधील काही महिला आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद सुरू झाला.

वाद वाढला अन् हाणामारी

वाद वाढल्यानंतर बसमधील काही महिला खाली उतरल्या. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पेट्रोल पंप मालकाने मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

काही वेळाने परिस्थिती निवळली होती. मात्र, त्यानंतर बसमधील एका तरुणाने संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी बसची चावी काढून घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत

घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकारामुळे परिसरात जवळपास दोन तास गोंधळाचं वातावरण होतं. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकही घटनास्थळी जमा झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं.

दरम्यान, या वादाबाबत महिला गोविंदा पथकातील सदस्यांनी वेगळी बाजू मांडली आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने बसमधील एका ज्येष्ठ नागरिकाशी अयोग्य भाषेत संवाद साधल्याने वाद वाढल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच बसची चावी काढून घेतल्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना जवळपास दोन तास तिथेच थांबावं लागल्याचंही त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाचा अर्नाळा सागरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

११ कंपन्या, ७ हजार कोटी! IPO बाजारात चालू आठवड्यात निधी सज्जता

Mumbai : बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव! गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त गणपती 'विशेष गाड्या'; पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा, LTT आणि मडगाव दरम्यान ४ गाड्या

मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र'; अधिकाऱ्यांना पुढची जबाबदारी कामगिरीनुसार, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य