मुंबई

Mumbai : चर्चगेटमध्ये प्रवाशांसाठी वाचनालय; पश्चिम रेल्वेकडून ‘कम्युनिटी बुक बँक’चा शुभारंभ

चर्चगेट स्थानकावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या प्रवासासोबतच आवडीचे पुस्तकही वाचायला मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने शुक्रवारी चर्चगेट स्थानकावर ‘कम्युनिटी बुक लायब्ररी’ सुरू केले आहे. याद्वारे प्रवाशांना विविध भाषांमधील पुस्तके मोफत वाचता येतील.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/ मुंबई:

चर्चगेट स्थानकावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या प्रवासासोबतच आवडीचे पुस्तकही वाचायला मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने शुक्रवारी चर्चगेट स्थानकावर ‘कम्युनिटी बुक लायब्ररी’ सुरू केले आहे. याद्वारे प्रवाशांना विविध भाषांमधील पुस्तके मोफत वाचता येतील. माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आणि मुंबई सेंट्रलचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग यांच्या हस्ते एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.

या वाचनालयाची सुरुवात सुमारे १,२०० पुस्तकांनी झाली आहे, तर देणगीच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या एकूण ‘बुक बँक’मध्ये ४ हजार पुस्तकांचा साठा आहे. प्रवासी ही पुस्तके स्वतःसोबत नेऊन प्रवासात किंवा मोकळ्या वेळेत वाचू शकतात आणि नंतर ती परत करू शकतात. यासाठी कोणतेही सदस्यत्व शुल्क किंवा आर्थिक व्यवहार आकारला जाणार नाही, ज्यामुळे ही सुविधा सर्वांसाठी खुली असेल.

प्रवाशांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांचा प्रवासाचा वेळ अधिक उत्पादक करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वैविध्यपूर्ण वाचकवर्ग लक्षात घेऊन या वाचनालयात इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती भाषांमधील पुस्तके ठेवली आहेत. या सुविधेचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाचकांना मदत करण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

चर्चगेट स्थानकावर दररोज ८.३४ लाख प्रवाशांची ये-जा असते. नियमित प्रवाशांसाठी हे वाचनालय एक मोठे आकर्षण ठरेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा उपक्रम सामूहिक सहभाग, ज्ञानाची देवाणघेवाण आणि पर्यावरणीय जबाबदारी एकाच छताखाली आणतो. येत्या काळात यात आणखी हजारो पुस्तकांची भर पडणार असल्याने, मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एका स्थानकावर हे सामुदायिक वाचनालय एक नवीन वाचन संस्कृती रुजवण्यासाठी सज्ज झाले आहे.

पर्यावरण पूरक उपक्रम

या प्रकल्पातून पर्यावरणाच्या शाश्वततेचा एक मोठा संदेशही देण्यात आला आहे. वाचनालयात वापरलेले कप्पे आणि कव्हर्स ‘सायकलोथॉन’ उपक्रमांतर्गत गोळा केलेल्या पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवले गेले आहेत. प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून पश्चिम रेल्वेने पर्यावरण जागृतीची सांगड एका सार्वजनिक सेवा प्रकल्पाशी घातली आहे.

Mumbai : मध्य रेल्वेवर आज रात्री ११.१६ ची शेवटची लोकल

पुणे विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादीची माघार; महाविकास आघाडीत भूकंप, मित्रपक्षांचा 'विश्वासघाता'चा आरोप

अंबरनाथमध्ये सर्पदंशाने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; आधी सापाचा फोटो दाखवा, मग उपचार सुरू करू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Mumbai : प्रदूषण करणाऱ्यांना पकडण्यासाठी सेन्सरची मदत; २० दिवसात यंत्रणा बसवण्याचे कानपूर आयआयटीला निर्देश

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींच्या शैक्षणिक सवलती; राज्य सरकारचा मोठा निर्णय