मुंबई : परिचारिकांचे ड्युटी पॅटर्न बदलल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. नायर रुग्णालयाच्या या निर्णयाचा कामगार संघटनांनी विरोध केला आहे. रुग्णालयाच्या निर्णयाला न जुमानता ड्युटी पॅटर्नमध्येच काम करण्याचा निर्णय कामगार संघटनेच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रश्नावरून परिचारिकांवर कारवाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटनेच्या बैठकीत झाल्याचे दी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.
नायर, केईएम, सायन रुग्णालयातील परिचारिका संवर्गाच्या ड्युटी पॅटर्नमध्ये बदल करण्याचा आणि साप्ताहिक सुट्ट्या कमी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या गंभीर प्रश्नी सोमवारी ना. म. जोशी मार्ग येथील म्युनिसिपल मजदूर युनियन कार्यालयात परिचारिका संवर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कामगार संघटनांची बैठक पार पाडली. या बैठकीत प्रशासनाच्या या एकतर्फी निर्णयाचा निषेध करण्यात आला आणि परिचारिका संवर्गाला सध्या सुरू असलेला आणि त्यांच्या सेवाशर्तीचा भाग असलेला ड्युटी पॅटर्न लागू असलाच पाहिजे. याबाबत सर्व कामगार संघटनांचे एकमत झाले. प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाला न जुमानता सर्व परिचारिका सध्या सुरू असलेल्या ड्युटी पॅटर्नमध्येच या तीनही रुग्णालयांमध्ये सेवा देतील, असे ठरविण्यात आले. तरीही प्रशासनाने अतिरेकी भूमिका घेऊन जबरदस्तीने निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास किंवा परिचारिकांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारल्यास या तीनही रुग्णालयांतील परिचारिका त्याच क्षणी तीव्र आंदोलन करतील आणि रुग्णसेवा कोलमडली तर त्याला प्रशासनच जबाबदार असेल, असेही बने यांनी स्पष्ट केले.
पालिका प्रशासनाने योग्य विचार करून एकतर्फी वेगळा ड्युटी पॅटर्न राबवण्याचा, परिचारिका संवर्गाच्या साप्ताहिक सुट्ट्या कमी करण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा, रद्दबातल करण्यात यावा, असे आवाहन सर्व कामगार संघटनांनी केले आहे. यावेळी दि म्युनिसिपल युनियनचे रमाकांत बने, रंगनाथ सातवसे, म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या त्रिशीला कांबळे, रंजना आठवले, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या ॲड. रचना अग्रवाल, नोबल नर्सिंग युनियनच्या कल्पना गजूला आदी उपस्थित होते.