भाईदरः मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही महिन्यांपासून माती भराव व आरएमसी फ्लांटच्या डम्परने धुमाकुळ घालत आहेत. एका महिन्यांत या कारणास्तव तीन अपघात झाले असून चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
रविवारी दुपारी भाईंदर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर एका अवैध माती भराव करणाऱ्या डंपरखाली रामचरण पाल (३०) नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. डम्परचालक रामचंद्र मराठे (५५) घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे सांगितले जात आहे.
मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेत रुग्णालयात पाठवला. या अवैध माती भरावामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुलही बुडत आहे. तहसीलदार, महापालिका अधिकारी आणि स्थानिक खासदार, आमदार याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. या अवैध माती भरावामुळे शहरात प्रदूषण वाढले, रस्त्यावर धूळ उडत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच वाहतूककोंडी आणि अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांनी चेतावणी दिली आहे की, मीरा रोडवरील अवैध माती भरावाच्या वाहनांना तात्काळ थांबवले नाही, तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.