विदेशी गुंतवणूक संस्थांनी २८ ऑक्टोबरपर्यंत भारतीय शेअर बाजारात १५८६ कोटी रुपयांची विक्री केली आहे. मजबूत अमेरिकन डॉलर, कमजोर रुपयामुळे विदेशी संस्थांनी सलग दुसऱ्या महिन्यात विक्रीचा मारा केला आहे.
तथापि, गेल्या आठवड्यात भारतीय शेअर निर्देशांकांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिल्याने फंडाच्या बाहेर पडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या खाली आले आहे. गेल्या १० पैकी नऊ सत्रांमध्ये भारतीय शेअर निर्देशांक तेजीत बंद झाले.
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, सप्टेंबरमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारात ७,६२४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. २०२२ मध्ये आतापर्यंत त्यांनी एकत्रित आधारावर १,७०,३७५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
विदेशी गुंतवणूक संस्थांनी गेल्या एक वर्षापासून भारतीय भांडवली बाजारांमध्ये समभागांची विक्री करत आहेत, ज्याची सुरुवात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी झाली होती. दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच विदेशी संस्थांनी उत्तम खरेदी केली होती. या महिन्यातील आणखी एक सत्र बाकी आहे. ऑगस्टमध्ये ५१,२०० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी विदेशी संस्थांनी केली होती. गेल्या काही दिवसांत विदेशी संस्थांनी गेल्या चार सत्रात ६ हजार कोटींची गुंतवणूक केली.