भोपाळ : जगातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेल्या आपल्या देशात २०२५ मध्ये विविध कारणांमुळे एकूण १६६ वाघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत ४० ने अधिक असल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) ताज्या आकडेवारीतून पुढे आली आहे. निसर्ग समतोल आणि वन्यजीवांच्या संख्येबाबत हे चिंता वाटावी असे वृत्त आहे. विशेष म्हणजे ‘एनटीसीए’च्या या आकडेवारीनुसार ‘व्याघ्र राज्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सर्वाधिक ५५ वाघांचे मृत्यू नोंदवले गेले आहेत. इतर राज्यांमध्ये महाराष्ट्रात ३८, केरळमध्ये १३ आणि आसाममध्ये १२ वाघांचे मृत्यू झाले. मृत्युमुखी पडलेल्या १६६ वाघांपैकी ३१ बछडे होते.
जागेच्या तुटवड्यामुळे होणाऱा हद्दीबाबतचा (टेरिटोरियल) तीव्र संघर्ष हे वाघांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २०२४ मध्ये देशात १२६ वाघांचा मृत्यू झाला होता; २०२५ मध्ये ही संख्या ४० ने वाढली असल्याचे उपलब्ध आकडे दर्शवतात. मागील वर्षात वाघाचा पहिला मृत्यू २ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी वन विभागात नोंदवला गेला. जिथे एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांनी मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र राखीव क्षेत्रात एका मादी वाघाचा मृत्यू झाला. ‘एनटीसीए’च्या आकडेवारीनुसार, अलीकडील प्रौढ नर वाघाचा मृत्यू २८ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील उत्तर सागर भागात नोंदवण्यात आला.
जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के भारतात
आंतरराष्ट्रीय ‘व्याघ्र दिनी’ २०२३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील वाघांची संख्या २०१८ मधील २,९६७ वरून २०२२ मध्ये ३,६८२ इतकी झाली असून, दरवर्षी सुमारे सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. जगातील एकूण वाघांपैकी सुमारे ७५ टक्के वाघ भारतात असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.