नवी दिल्ली : संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १७ खासदार आणि २ संसदीय स्थायी समित्यांची ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’साठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सात खासदारांनी या पुरस्कारांमध्ये बाजी मारली असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे.
शिंदे गटाचे श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के तसेच भाजपच्या स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनाही ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रत्येक वर्षी संसदेत उत्कृष्ट, सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदारांना ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’कडून हा पुरस्कार दिला जातो. या निवडीसाठी प्रश्न विचारणे, वादविवादात सहभाग, कायदेविषयक योगदान आणि समित्यांमध्ये केलेल्या कामांचे मूल्यांकन हे निकष असतात. हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही यादी जारी केली.
भर्तृहरी महताब (भाजप), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी), एन. ऑफ. प्रेमचंद्रन (आरएसपी), श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे) हे चार खासदार १६व्या आणि १७व्या लोकसभेत संसदेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहेत. तसेच स्मिता वाघ (भाजप), अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट), नरेश गणपत म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस), मेधा कुलकर्णी (भाजप), प्रवीण पटेल (भाजप), रवी किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), विद्युत बरन महतो (भाजप), पी. पी. चौधरी (भाजप), मदन राठोड (भाजप), सी.एन. अन्नादुराई (द्रमुक), दिलीप सैकिया (भाजप) या खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.