अवंतीपोरा : ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित करण्यात आल्यानंतरही भारताने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम सुरूच ठेवली असून गेल्या ४८ तासांत सुरक्षा दलांनी त्राल आणि शोपियानमध्ये केलेल्या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. सीआरपीएफ, भारतील लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
काश्मीर परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिर्दी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा दलाच्या कारवाईबाबत माहिती दिली. सीआरपीएफ, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे राबविलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे बिर्दी यांनी सांगितले. अवंतीपुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिर्दी म्हणाले की, काश्मीरमधील दहशतवादाला आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांची समन्वय बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. मागच्या ४८ तासांत दोन कारवाया करण्यात आल्या, ज्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.
भविष्यातही समन्वय
काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शोपियान आणि त्राल येथील दोन ऑपरेशन्समध्ये सहा दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे, असेही बिर्दी म्हणाले. सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक मितेश यांनीही याच पत्रकार परिषदेत सुरक्षा दलाच्या कारवायांची माहिती दिली. ते म्हणाले, भविष्यातही तिन्ही सुरक्षा दलांमध्ये असाच समन्वय राहील, याची आम्ही खात्री देतो. एकमेकांच्या सहकार्यातून लवकरच काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन केले जाईल.
गुरुवारी सकाळी विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे त्राल येथे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली. चिनार कॉर्प्सच्या माहितीनुसार, या भागात संशयास्पद हालचाल दिसून आली होती. सुरक्षा दलाने हटकल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.