हैदराबाद : तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर ग्रेहाऊंड्स फोर्सने एका महिला नक्षलवाद्यांसह ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एथुरंगाराम मंडलच्या चालपाका भागातील जंगलात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना ही चकमक झाली, असे पोलिसांनी सांगितले. माओवाद्यांकडून गोळीबार सुरू झाल्यानंतर तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि माओवादीविरोधी पथकाने जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना ठार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन एके-४७ रायफल्स आणि इतर शस्त्रेही जप्त केली आहेत.
या चकमकीत येलांडू-नरसंपेट क्षेत्र समितीचा कमांडर कुरुसम मंगू ऊर्फ भद्रू ऊर्फ पपण्णा (३५) याच्यासह इगोलाप्पू मल्लया ऊर्फ मधू (४३), मुस्की देवल ऊर्फ करुणाकर (२२), मुस्की जमुना (२३), जयसिंग (२५), किशोर (२२) आणि कामेश (२२) हे ठार झाले आहेत.
रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास चकमक सुरू झाली. तेलंगणा ग्रेहाऊंड्सने माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. यावेळी माओवाद्यांनी आत्मसमर्पण न करताच तेलंगणा ग्रेहाऊंड्स युनिटवर गोळीबार केला, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईबाबत दक्षता घेत पोलीस विभागाने परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली आहे. माओवाद्यांविरोधातील हे मोठे यश मानले जात असून, यामुळे या भागातील सुरक्षा स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.