घाऊक महागाईचा दर ऑगस्टमध्ये १२.४१ टक्क्यांवर आला आहे. जुलै महिन्यात तो १३.९३ टक्के होते. घाऊक महागाई दर सलग तिसऱ्या महिन्यात घसरला आहे. बांधकाम क्षेत्रातील किमती नरमल्याने हे घडले आहे. मात्र, या काळात खाद्यपदार्थांच्या किमती वाढतच गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये घाऊक महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अन्नपदार्थ, खनिज तेल, नैसर्गिक वायू, धातू, रासायनिक उत्पादने, वीज आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ आहे.
घाऊक महागाईवर आधारित चलनवाढ जुलैमध्ये १३.९३ टक्के आणि गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ११.६४ टक्के होती. ऑगस्ट हा सलग १७ वा महिना आहे ज्यात घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय) दुहेरी अंकात आहे. या वर्षी मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकाने १५.८८ टक्क्यांचा उच्चांक गाठला होता. जुलैमधील १०.७७ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थांची महागाई १२.३७ टक्क्यांवर पोहोचली.
ऑगस्ट महिन्यात भाज्यांच्या किमती २२.२९ टक्क्यांनी वाढल्या आहेत, ज्या जुलैमध्ये १८.२५ टक्क्यांनी वाढल्या होत्या. ऑगस्टमध्ये इंधन आणि उर्जेच्या बाबतीत महागाई ३३.६७ टक्के होती, जी जुलैमध्ये ४३.७५ टक्के होती. उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये महागाई दर अनुक्रमे ७.५१ टक्के आणि (-) १३.४८ टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मुख्यतः किरकोळ चलनवाढीकडे त्यांचे चलनविषयक धोरण तयार करण्यासाठी आधार म्हणून पाहते. किरकोळ चलनवाढ सलग आठव्या महिन्यात रिझव्र्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या मर्यादेच्या वर राहिली. ऑगस्ट महिन्यात हा दर सात टक्के राहिला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, यावेळी घाऊक महागाई दरामध्ये खनिज तेल, खाद्यपदार्थ, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, रासायनिक व रासायनिक उत्पादने, वीज आणि खाद्यपदार्थांच्या महागाई दराचा वाटा राहिला. या उत्पादनांचा घाऊक महागाई दरात मागील महिन्याच्या तुलनेत जास्त वाटा दिसून येत आहे.
वर्षात तीनदा व्याजदरात वाढ
महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआयने या वर्षी प्रमुख व्याजदर तीन वेळा वाढवून ५.४० टक्के केला आहे. केंद्रीय बँकेच्या अंदाजानुसार,२०२२-२३मध्ये किरकोळ महागाई सरासरी ६.७ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.