राष्ट्रीय

नोटांवरील फोटोवरून नवा वाद सुरु

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक टप्प्यातून जात आहे

वृत्तसंस्था

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटेवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केंद्र सरकारकडे केल्यानंतर नवा राजकीय वाद उफाळला आहे. अनेक नेत्यांनी मग नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापावा, अशा मागण्या केल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक टप्प्यातून जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे. त्यासाठी इतर उपायांसोबतच देवी-देवतांचा आशीर्वादही आवश्यक आहे, त्यामुळे आता नोटांवरही गणेश-लक्ष्मीचे चित्र लावावे, अशी मागणी त्यांनी केली. केजरीवाल यांच्या या मागणीनंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी नोटेवर अमुकच फोटो हवा, अशी मागणी केल्याने दिवसभर या मुद्यावर जोरदार चर्चा झडली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा - नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा, अशी मागणी केली आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर अशा प्रकारच्या २०० रुपयांच्या नोटेचा एक फोटो शेअर केला आहे. या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे. ‘हे परफेक्ट आहे’, असे कॅप्शन त्यांनी आपल्या पोस्टला दिले आहे.

राम कदमांकडून पंतप्रधान

मोदींच्या फोटोची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो चलनी नोटांवर छापण्याची मागणी भाजप नेते राम कदम यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी ५०० रुपयाच्या नोटांचे ४ फोटो ट्विट केले आहेत. या नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर व पंतप्रधान मोदींचा फोटो दिसत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी, ‘अखंड भारत... नवा भारत... महान भारत... जय श्रीराम... जय मातादी’ अशी ओळ लिहिली आहे. यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

गौतम बुद्धांच्या फोटोची

रिपब्लिकन पक्षाची मागणी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनीही यावर गौतम बुद्धांचा फोटो असावा, अशी मागणी केली आहे. सचिन खरात म्हणाले की, ‘भारत देशाची ओळख गौतम बुद्ध आहे तसेच जगातील प्रत्येक माणूस भारताला गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखतो. त्यामुळे भारतीय चलनावर गौतम बुद्ध यांचा फोटो घेण्यात यावा’.

बाळासाहेबांचा फोटो हवा - अनिल परब

‘शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या भानगडीत शिवसेना जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो नोटेवर असायला पाहिजे तर मी सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचे कारण असे आहे की माझा नेता असायला पाहिजे असे जर प्रत्येकाला वाटत असेल, तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तर असेच वाटेल की बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे’, अशी भूमिका शिवसेना नेते अनिल परब यांनी मांडली.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले