राष्ट्रीय

तेलंगणात ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेला एक रुग्ण सापडला

वृत्तसंस्था

तेलंगणा राज्यात ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेला एक रुग्ण सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती ८० वर्षीय असून त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. विशेष म्हणजे या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते.

ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेल्या तेलंगणा येथील व्यक्तीला सध्या सौम्य लक्षणे जाणवत आहेत. याआधी ओमायक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ या उपप्रकारांमुळे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची पाचवी लाट आली होती. त्यानंतर या उपप्रकाराचा फैलाव अमेरिका तसेच युरोपीय देशांमध्ये पसरला होता. याच कारणामुळे युरोपीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक विभागाने ओमायक्रॉनच्या बीए-५ या उपप्रकाराला चिंताजनक म्हटले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही या उपप्रकाराला दखलपात्र आणि चिंताजनक असल्याचे जाहीर करीत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या उपप्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत असली तर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण किंवा मृत्यूसंख्या वाढलेली नाही. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले आहे. तसेच मागील कोरोना लाटांमध्ये नागरिकांमध्ये मिश्र रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतात सध्या मृत्यूसंख्या वाढण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.

बीए-४ उपप्रकाराचे दोन रुग्ण

याआधी भारतात ओमायक्रॉन विषाणूच्या बीए-४ या उपप्रकाराची लागण झालेले दोन रुग्ण आढळले होते. यातील एक रुग्ण हा हैदराबाद तर एक तामिळनाडू येथील आहे. हैदराबाद येथील रुग्ण दक्षिण आफ्रिकेमधून प्रवास करुन आलेला होता. विमानतळावर आल्यानंतर त्याची चाचणी केली गेली. तेव्हा त्याला बीए-४ या उपप्रकाराची लागण झाल्याचे समोर आले होते. तर तामिळनाडू येथील रुग्ण ही १९ वर्षीय महिला असून या महिलेचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. या महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. तरीदेखील या महिलेला बीए-४ या उपप्रकारची लागण झाली होती.

'त्या' तालुक्यांनाही मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही

औषधांच्या दरवाढीवर ‘सर्वोच्च’ संताप; ‘कॅन्सर’ औषधांच्या १० पट जास्त नफा कमावण्यावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Mumbai : अतिक्रमणांवर हातोडा; दादर स्थानक परिसरात पदपथ झाले मोकळे, ‘जी’ उत्तर विभागाची कारवाई

दक्षिण मुंबईतील घरसाठा ७४ टक्क्यांनी घटला; मुंबईच्या पलीकडे रिअल इस्टेटचा विस्तार, पश्चिम परिघीय भागात २४० टक्क्यांची वाढ

टाटा कोणाला करणार ‘टाटा’?