भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात देशातील प्रत्येकामध्ये देशभावना पेटून उठली आहे. देशातील प्रत्येक घर तिरंग्यासह डौलाने फडकत आहे. त्यातच बिहारमधील भागलपूर येथे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा करून तब्बल ७५ मीटर लांबीचा झेंडा फडकवून विश्वविक्रम करण्यात आला. या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये झाली आहे.
‘हर घर तिरंगा’ या अभियानाअंतर्गत भागलपूर येथील जयप्रकाश मैदान ते लाला लजपत पार्क येथे ७५ मीटर लांब आणि सहा मीटर रुंद भारताचा तिरंगा फडकवण्याचा विश्वविक्रम रचण्यात आला. शाळेतील विद्यार्थी आणि लोकसहभागातून सकाळी दहा ते सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत हा भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. या आगळ्यावेगळ्या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली आहे. या कामगिरीबद्दल मिशन वंदे मातरम फाउंडेशन आणि श्रीराम कर्मभूमी न्यासचे अध्यक्ष अर्जित शाश्वत चौबे यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या सिनियर एचओडी व विशेष प्रतिनिधी सुषमा संजय नार्वेकर तसेच विशेष प्रतिनिधी संजय विलास नार्वेकर यांच्या हस्ते मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.
स्वातंत्र्यसैनिकाच्या आणि जनतेच्या अथक परिश्रमानंतर व बलिदानानंतर ब्रिटिशांच्या जुलमी आणि गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात आहे.