नवी दिल्ली : केंद्र सरकारने मतदार वगळण्याच्या माध्यमातून निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा करतानाच ही तर सेटिंग असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला. तसेच, १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे मतदार यांद्यामधून वगळणे ही कोणती 'सेटिंग' आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नेते आइशी घोष, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विराज देवांग आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांना रोखण्यासाठी राजधानीत निर्बंध लादण्यात आल्याचा आरोपही अभिजीत दिपके यांनी केला.
पत्रकारांना लक्ष्य केल्याचा आरोप
पोलिसांनी आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य केल्याचा आरोप आंदोलक नेत्या नेहा बोरा यांनी केला. प्रेस क्रेडेन्शियल्स असूनही त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांचे कॅमेरे हिसकावून घेण्यात आले. एका महिला पत्रकाराशी संबंधित कथित लैंगिक छळाच्या प्रकरणाचा उल्लेख त्यांनी केला. तसेच, या आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.