कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण आणखी पेटले आहे. तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार ऋतब्रता बंडोपाध्याय आणि संदीपान साहा यांनी केलेल्या तक्रारीवरून सीआयडीने टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, सरकारने तृणमूल काँग्रेसविरुद्ध कोणत्याही प्रकारची सूडाची कारवाई केलेली नाही असा दावा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
९ मे रोजी अभिषेक बॅनर्जी यांनी पाठवलेल्या पत्रात सोवनदेब चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती सुचवण्यात आली होती, असे अधिकारी म्हणाले.
२० मे रोजी सादर केलेल्या ७० आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या ठरावाच्या प्रतिमध्ये १० पेक्षा जास्त नावे केवळ टाईप केलेली आहेत. ती स्वाक्षरी म्हणून मान्य होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात, विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार, हरे स्ट्रीट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. गृहमंत्री म्हणून माझ्या मान्यतेनंतर हा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.
हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत
सीआयडीने आतापर्यंत १३ टीएमसी आमदारांची चौकशी केली असून, यामध्ये व्हिडीओग्राफी आणि हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. यातील अरुप रॉय, बहारुल इस्लाम आणि सुभाषिश दास या तीन आमदारांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अभिषेक बॅनर्जींची प्रतिक्रिया
दुसरीकडे, अभिषेक बॅनर्जी यांनी या कारवाईला भाजप सरकारचा 'राजकीय सूड' असल्याचे म्हटले आहे.
सोमवारी सीआयडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती, मात्र प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी वकिलांमार्फत मुदतवाढीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सीआयडीला मुदत वाढवून द्यायची की नाही, हा निर्णय पूर्णपणे तपास यंत्रणेचा असेल, यात सरकार हस्तक्षेप करणार नाही.
टीएमसी 'डिफंक्ट'
मुख्यमंत्र्यांनी टीएमसीवर टीका करताना म्हटले की, "काही लोकांना हे सूडबुद्धीचे वाटू शकते, परंतु आम्ही तसे काहीही करत नाही, कारण तो पक्ष आधीच संपला आहे." फालता मतदारसंघातील उमेदवार जहांगीर खान यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा संदर्भ देत, त्यांनी टीएमसी पक्ष पूर्णपणे निकामी झाला असल्याचे म्हटले आहे.
भारतीय न्याय संहितेच्या तरतुदींनुसार बनावटगिरी केल्याप्रकरणी सीआयडीने कडक कारवाई करावी, असे निर्देश आपण दिले असल्याचेही मुख्यमंत्री अधिकारी यांनी स्पष्ट केले.
खोट्या स्वाक्षऱ्यांचे प्रकरण
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून सोवनदेब चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्याबाबतचा टीएमसीचा ठराव बनावट असून, त्यावर आमदारांच्या स्वाक्षऱ्या खोट्या असल्याची तक्रार या दोन आमदारांनी विधानसभा सचिवालयाकडे केली होती. या घडामोडीनंतर टीएमसीने तत्काळ दोन्ही आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.