नवी दिल्ली / जयपूर : फ्रैंकफर्टहून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबत हायजॅकचा (विमान अपहरणाचा) खोटा इशारा मिळाल्यामुळे खळबळ उडाली. यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून हे विमान जयपूर विमानतळावर वळवण्यात आले. कसून तपासणी केल्यानंतर आणि सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतर हे विमान पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले, अशी माहिती अधिकारी आणि सूत्रांनी दिली आहे.
विमान क्रमांक एआय २०३०, बोईंग ७८७-९ विमानात सुमारे २९३ प्रवासी आणि १३ विमान कर्मचारी (क्रू) होते. विमान सकाळी ९:३५ वाजता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. सूत्रांच्या माहितीनुसार, विमान मुंबई फ्लाईट इन्फर्मेशन रिजन क्षेत्रामध्ये असताना, पायलटने 'स्कॉवक कोड ७५00' सक्रिय केला. हा कोड विमान अपहरणाची किंवा बेकायदेशीर हस्तक्षेपाची शक्यता दर्शवतो. या धोक्याच्या सूचनेनंतर विमान तात्काळ जयपूर विमानतळाकडे वळवण्यात आले.
विलगीकरण बे
लँडिंगनंतर अवघ्या दहा मिनिटांत विमान विलगीकरण बे मध्ये नेण्यात आले. सुरक्षेची खात्री करण्यासाठी सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवून विमानतळ इमारतीत आणण्यात आले. साहाय्यक आयुक्त शिव दयाल यांनी सांगितले की, आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने पोलिसांना सतर्क केले. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विमानाची कसून तपासणी केली.
एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित सुरक्षा यंत्रणांनी आवश्यक ती तपासणी पूर्ण केल्यानंतर विमान आणि कर्मचाऱ्यांना मंजुरी दिली. सर्व प्रवाशांची पुन्हा सुरक्षा तपासणी करून त्यांना पुन्हा विमानात बसवण्यात आले, त्यानंतर विमान दिल्ली प्रवासासाठी रवाना झाले.