नवी दिल्ली : थायलंडमधील फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2379 या विमानात मंगळवारी (दि. ४) अचानक हवाई धक्के (टर्ब्युलन्स) बसल्याने मोठा गोंधळ उडाला. सुमारे दोन ते तीन मिनिटे विमान जोरदार हेलकावत राहिले आणि काही क्षणांत ते सुमारे ३०० फूट खाली आल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. या घटनेत १० ते १२ प्रवाशांसह काही केबिन क्रू सदस्य किरकोळ जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रवासादरम्यान धक्के
एअरबस A320 हे विमान दिल्लीत उतरण्यापूर्वी क्रूझ टप्प्यात असताना अचानक हवाई धक्क्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला. त्यामुळे विमानाची उंची काही क्षणांसाठी अचानक कमी झाली आणि ते सुमारे ३०० फूट खाली आले. या जोरदार धक्क्यांमुळे काही प्रवासी आणि विमान कर्मचारी जखमी झाले.
जखमींना तातडीने वैद्यकीय मदत
विमान सकाळी ११ वाजल्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरले. विमानतळावर आधीच वैद्यकीय पथक आणि एअर इंडियाचे अधिकारी तैनात होते. जखमी झालेल्या १० प्रवासी आणि २ विमान कर्मचाऱ्यांना विमानतळावरील मेदांता मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
'विमान अचानक हादरले, अनेक प्रवासी जखमी'
या विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, "उड्डाणाला दीड तास झाला होता. पहाटेची वेळ असल्याने बहुतांश प्रवासी झोपले होते. अचानक विमानाला जोरदार धक्के बसू लागले आणि ते काही मिनिटे वर-खाली हेलकावत राहिले. सुमारे दोन ते तीन मिनिटे हा प्रकार सुरू होता. अनेक प्रवासी जागेवरून उडाले. काहीजण जखमी झाले. विमानात १०० हून अधिक प्रवासी होते. या घटनेबाबत आम्ही एअर इंडियाविरोधात निश्चितपणे कारवाई करणार आहोत."
'कोणालाही गंभीर दुखापत नाही' : एअर इंडिया
या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ४ ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एआय-२३७९ विमानाला प्रवासादरम्यान अल्पकाळ हवाई धक्क्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे विमानाच्या उंचीत क्षणिक बदल झाला.
प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरले असून सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
एअर इंडियाने सांगितले की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जखमींना सर्व आवश्यक वैद्यकीय मदत दिली जात असून, या घटनेच्या तपासासाठी संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.