अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया AI-171 ड्रिमलायनर बोईंग विमान दुर्घटनेनंतर विमान अपघात तपास ब्युरोने १२ जुलै रोजी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. या प्रकरणात अंतिम निकाल येण्याची वाट न पाहता काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी निराधार आणि वैमानिकांबद्दल बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केले. या पार्श्वभूमीवर The Wall Street Journal आणि Reuters यांच्यावर फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP) ने जोरदार आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच, त्यांनी माफीची मागणीही केली आहे. या अहवालाचा गैरवापर करून काही माध्यमांनी भारतीय वैमानिकांवर दोषारोप केल्याचं FIP चं म्हणणं आहे.
काय आहे प्रकरण?
अहमदाबादहून लंडन गॅटविक्सला जाणारे विमान १२ जून रोजी उड्डाण घेताच काही सेकंदांत कोसळले. या भीषण दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा प्राथमिक तपास Aircraft Accident Investigation Bureau ने केला असून त्याचा प्राथमिक अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
परंतु, The Wall Street Journal ने असा दावा केला की, कॅप्टनने जाणूनबुजून विमानाचे इंधन स्विच बंद केले. तसेच, Reuters च्या एका बातमीत देखील या अपघातास वैमानिकाची चूक कारणीभूत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
कायदेशीर नोटीस पाठवली -
या दोन्ही माध्यामांविरोधात FIP ने कठोर भूमिका घेतली आहे. FIP ने WSJ आणि Reuters यांना कायदेशीर नोटीस पाठवून सार्वजनिक माफी मागण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. तसेच बातमीमध्ये योग्य ती दुरुस्ती करण्यासही सांगितले आहे.
FIP चे अध्यक्ष कॅप्टन रंधावा म्हणाले, प्राथमिक अहवालात जी माहिती आहे, ती पूर्णपणे दुर्लक्षित करून त्यांनी अशा प्रकारचे वृत्त दिलं. हे खूपच धोकादायक आहे. ते स्वतः निष्कर्ष काढत आहेत. ते तपास संस्था आहेत का? त्यांचं वृत्त तथ्याधारित नाही. जर त्यांनी माफी मागितली नाही किंवा खुलासा दिला नाही, तर आम्ही पुढील कायदेशीर पावलं उचलू असा इशाराही रंधावा यांनी दिला.
अंतिम अहवाल येईपर्यंत थांबावं - NTSB
अमेरिकेतील National Transportation Safety Board (NTSB) ह्या तपास संस्थेने देखील या प्रकरणी माध्यमांवर टीका केली आहे. NTSB च्या अध्यक्षा जेनिफर होमेंडी यांनी सांगितलं की, “प्राथमिक अहवालावर आधारित निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. या प्रकारच्या अपघातांची चौकशी खूप सखोल व वेळखाऊ असते. सर्व मीडिया व लोकांनी अंतिम तपास अहवाल येईपर्यंत थांबावं.”
पश्चिमी माध्यामांना चपराक
कॅप्टन रंधावा म्हणाले, “NTSB चं हे वक्तव्य खूप दिलासादायक आहे. यामुळे पश्चिमी माध्यामांनी भारतीय वैमानिकांना जबाबदार धरण्याचे जो प्रयत्न सुरू केले होते, त्याला जोरदार उत्तर मिळालं आहे.”