राष्ट्रीय

उत्तराखंडमध्ये सरकारी शाळेजवळ सापडल्या जिलेटीनच्या १६१ कांड्या, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील डाबरा येथील सरकारी शाळेजवळ झाडीमध्ये स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Swapnil S

अल्मोडा : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील डाबरा येथील सरकारी शाळेजवळ झाडीमध्ये स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून जिलेटीनच्या १६१ कांड्या जप्त केल्या असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटानंतर देशभरातली सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. दिल्ली बॉम्ब स्फोटाआधी हरयाणातून तब्बल २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. आता उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील डाबरा येथील सरकारी शाळेजवळ झाडीमध्ये स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.

डाबरातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू शाळेजवळील झाडीत गेला. हा चेंडू शोधत असताना मुलांना झाडीत स्फोटके आढळली. मुलांनी याबाबत त्वरित मुख्याध्यापकांना कळविले, त्यानंतर मुख्याध्यापकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली. त्यानंतर बॉम्बशोधक पथक, श्वान पथकही दाखल झाले. घटनास्थळावरून जिलेटिनच्या १६० कांड्या आणि २० किलो स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात स्फोटक पदार्थ कायदा, १९०८च्या कलम ४(अ) आणि बीएनएसच्या कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत अल्मोडा पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, घटनास्थळावरून स्फोटकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर या जिलेटिनच्या कांड्या आणि स्फोटके कोणत्या उद्देशाने तिथे ठेवण्यात आल्या होत्या हे स्पष्ट होईल. साधारणत: ही सामग्री रस्तेकामात दगड फोडण्यासाठी वापरण्यात येते. परंतु पोलीस सर्व पैलूंचा विचार करीत आहेत.

इंधन दरवाढीचा फटका! इंडिगोकडून आजपासून तिकिटांवर अधिभार; विमानप्रवास महागणार

Mumbai : पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री दोन ब्लॉक; प्रभादेवी पूल पाडण्यासाठी बोरिवली ते भाईंदर दरम्यानही ब्लॉक

Maharashtra Weather Update : राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान वादळी पावसाचा इशारा

सिलिंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणे होणार मुश्किल; भारतासमोर नवे संकट

देशात एलपीजी, पेट्रोल, डिझेलची कमतरता नाही; केंद्राची पत्रकार परिषदेत माहिती