कोलकाता : पश्चिम बंगाल गेल्या १५ वर्षांत भीती, भ्रष्टाचार आणि घुसखोरीचा बळी ठरला आहे. २०२६ मध्ये भाजपचे सरकार आल्यास आम्ही ही घुसखोरी संपवणार. प्रत्येक घुसखोराला शोधून बाहेर काढू. विकासाला गती दिली जाईल आणि बंगालचा सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित केला जाईल, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी कोलकातात पत्रकार परिषद घेऊन तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
गृहमंत्री म्हणाले की, बंगालच्या सीमेवरून होणारी घुसखोरी हा केवळ राज्याचाच नाही, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषय आहे. देशाची संस्कृती आणि सुरक्षा वाचवण्यासाठी बंगालच्या सीमा सील करणारे सरकार आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे काम टीएमसी करू शकत नाही, तर केवळ भाजपच करू शकते, असेही ते म्हणाले.
गेल्या १५ वर्षांपासून भीती आणि भ्रष्टाचार ही बंगालची ओळख बनली आहे. १५ एप्रिल २०२६ नंतर जेव्हा बंगालमध्ये भाजपचे सरकार येईल, तेव्हा आम्ही 'बंग गौरव', 'बंग संस्कृती' आणि त्याच्या पुनर्जागरणाची सुरुवात करू. विवेकानंद, बंकिम बाबू, गुरुदेव टागोर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नातील बंगाल घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे शहा म्हणाले.
‘टीएमसी’च्या १५ वर्षांच्या राजवटीत भ्रष्टाचार, कुशासन आणि विशेषतः घुसखोरीमुळे बंगालची जनता भयभीत आणि साशंक आहे. आम्ही बंगालच्या जनतेला आश्वासन आणि वचन देतो की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येताच येथील वारसा पुनरुज्जीवित करू, विकासाची गंगा पुन्हा वेगाने वाहेल आणि गरीब कल्याणाला आमचे प्राधान्य असेल, असे आश्वासन गृहमंत्र्यंनी दिले.
‘हिंदू अस्मिता’ ठरणार प्रमुख मुद्दा
भाजप २०२६ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ‘हिंदू अस्मिता’, तसेच बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार आणि तेथील राजकीय परिस्थिती हे प्रमुख मुद्दे बनवण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर शहा यांचा बंगाल दौरा राज्यातील राजकारणात भाजपच्या आक्रमक भूमिकेचे स्पष्ट संकेत देत आहे.