ढाका : बांगलादेशात दोन आठवड्यांपासून हिंदूंवर सतत हल्ले होत आहेत. मैमनसिंग जिल्ह्यात दीपू चंद्र दास या हिंदू कामगाराची हत्या केल्यानंतर पुन्हा चौथ्यांदा एका हिंदू व्यावसायिकावर हल्ला करण्यात आला. ३१ डिसेंबरच्या रात्री खोकन चंद्र दास या ४० वर्षीय व्यापाऱ्यावर जमावाने हल्ला केला. कानेश्वर युनियनमधील केउरभंगा परिसरात फार्मसी चालवणारे खोकन चंद्र दास घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. जमावाने खोकन चंद्र यांना मारहाण करत त्यांच्यावर चाकूने वार केले. तसेच त्यांना जाळून टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र खोकन यांनी जवळच्या तलावात उडी मारल्यामुळे ते थोडक्यात बचावले. परंतु त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे कळते.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला हा क्रूर हल्ला झाला. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून ते तिलोई परिसरात पोहोचले तेव्हा काही गुंडांनी त्यांना अडवले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी दास यांच्यावर धारधार शस्त्रांनी अनेक वार केले. त्यांच्या शरीरावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र खोकन दास हे जवळच्या तलावात उडी मारण्यात यशस्वी झाले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाचवले. यानंतर त्यांना तातडीने शरीयतपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले.