जावई घरी येणार म्हटलं की सासरवाडीत स्वागताची जय्यद तयारी सुरू होते. जावयाची आवड-निवड लक्षात घेऊन जेवणाची खास तयारी केली जाते. पण आंध्र प्रदेशातील एका कुटुंबानं ही परंपरा अक्षरशः वेगळ्याच उंचीवर नेली आहे. १ नाही, २ नाही तर तब्बल १५८ पदार्थांची मेजवानी तयार करत सासरकडील मंडळींनी असा पाहुणचार केला, की जावईच नव्हे तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहणारेही थक्क झाले आहेत.
पहिली संक्रांत… आणि खास पाहुणचार
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील तेनाली येथील हे कुटुंब. मुलगी मोनिका आणि जावई श्रीदत्त यांची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत असल्याने सासरकडील मंडळींनी हा दिवस खास करण्याचं ठरवलं. आंध्र प्रदेशात संक्रांतीला जावयाचं स्वागत मोठ्या प्रेमानं केलं जातं. मात्र यावेळी हा पाहुणचार नेहमीपेक्षा कितीतरी पटींनी मोठा ठरला.
१५८ पदार्थांनी सजवली थाळी...व्हिडीओ व्हायरल
या मेजवानीत काय नव्हतं? लाडू, बर्फी, हलवा, काजू कतली अशा मिठाईंसोबतच आंध्र प्रदेशातील पारंपरिक गोड पदार्थही होते. याशिवाय भातापासून ते भाजी, आमटी, चटण्या, कोशिंबिरीपर्यंत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल होती. इतक्या पदार्थांनी सजलेली मांडणी पाहून श्रीदत्तही क्षणभर गोंधळले. "सुरुवात कुठून करू?" असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या संपूर्ण पाहुणचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस
या व्हायरल व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. "हा जावई खरोखर नशीबवान आहे", "अशी सासुरवाडी प्रत्येकाला मिळो", अशा कमेंट्सचा पाऊस पडतोय. एका मंत्र्यांनीही या घटनेचा उल्लेख करत, "संक्रांत हा आंध्र घरांमध्ये फक्त सण नसून भावना आहे. १५८ पदार्थ म्हणजे परंपरा, प्रेम आणि पाहुणचाराचं जिवंत उदाहरण," असं म्हटलं आहे.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात नाती, सण आणि एकत्र येणं हळूहळू कमी होत असताना, तेनालीतील या कुटुंबानं संक्रांतीच्या निमित्तानं परंपरा, आपुलकी आणि नात्यांची गोडी पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणली आहे.