मुंबई : रस्त्यांवरून प्रवास करताना योग्य मार्ग शोधण्यासाठी अनेकजण मोबाईलमधील मॅप्सचा वापर करतात. आता ॲपलने भारतातील युजर्ससाठी आपल्या Apple Maps सेवेत मोठे अपडेट आणले आहे. नव्या अपडेटमध्ये मराठीसह ११ भारतीय भाषांचा सपोर्ट, ३०० हून अधिक प्रसिद्ध ठिकाणांची 3D दृश्ये, रस्त्यांच्या पातळीवरील दृश्ये आणि ऑगमेंटेड रिॲलिटीच्या (AR) मदतीने दिशादर्शन अशा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करणे आणि अनोळखी ठिकाणी मार्ग शोधणे अधिक सोपे होणार आहे.
आता स्थानिक खुणांच्या आधारे मिळणार दिशादर्शन
नव्या ॲपल मॅप्समध्ये 'नॅचरल लँग्वेज गाइडन्स' ही सुविधा अधिक प्रगत करण्यात आली आहे. यामुळे केवळ रस्त्यांची नावे सांगण्याऐवजी जवळच्या प्रसिद्ध ठिकाणांचा आणि परिसरातील ओळखीच्या खुणांचा आधार घेऊन मार्ग दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे, एखाद्या रस्त्याला नाव नसल्यास आसपासच्या महत्त्वाच्या ठिकाणांचा संदर्भ देऊनही दिशादर्शन केले जाईल. युजर्सच्या भाषा सेटिंग्ज आणि स्थानानुसार ठिकाणांची नावे इंग्रजीसोबत प्रादेशिक भाषांमध्येही पाहता येतील.
३०० हून अधिक प्रसिद्ध ठिकाणांची 3D दृश्ये
नव्या अपडेटमध्ये भारतातील ३०० हून अधिक ऐतिहासिक वास्तू आणि प्रसिद्ध स्थळांची त्रिमितीय (3D) दृश्ये देण्यात आली आहेत. यामुळे एखाद्या ठिकाणाची रचना आणि परिसर अधिक तपशीलात पाहता येईल. तसेच 'लुक अराउंड' (Look Around) या सुविधेमुळे रस्त्यांच्या पातळीवरील इंटरॲक्टिव्ह दृश्यांच्या माध्यमातून भारतातील विविध ठिकाणांचा आभासी फेरफटका मारता येणार आहे.
लेन गाइडन्सपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्गापर्यंत सुविधा
प्रवास अधिक सोपा व्हावा यासाठी ॲपल मॅप्समध्ये अनेक उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत. 'लेन गाइडन्स'च्या मदतीने वाहन कोणत्या लेनमधून पुढे न्यायचे, याची माहिती मिळेल. एका प्रवासात १५ ठिकाणांपर्यंतचा मार्ग निश्चित करता येईल. तसेच 'शेअर ईटीए' सुविधेद्वारे आपण इच्छित व्यक्तीला पोहोचण्याची अंदाजित वेळ पाठवू शकता.
रस्त्यावरील अपघात किंवा इतर घटनांची माहिती 'सिरी'च्या मदतीने देता येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठीही मार्गाचे नियोजन करता येईल. याशिवाय सायकल प्रवासासाठी मार्गदर्शन, रस्त्यांवरील चढ-उतारांची माहिती आणि स्वतःच्या गरजेनुसार प्रवासाचा मार्ग तयार करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
आयफोनच्या कॅमेऱ्यातून मिळणार AR दिशादर्शन
अनोळखी ठिकाणी पायी प्रवास करताना दिशा समजणे अनेकदा कठीण जाते. यासाठी ॲपलने ऑगमेंटेड रिॲलिटी (AR) आधारित दिशादर्शनाची सुविधा दिली आहे. आयफोनच्या कॅमेऱ्यात दिसणाऱ्या प्रत्यक्ष परिसरावर मार्ग दाखवणाऱ्या सूचना दिसतील. त्यामुळे युजर्सना योग्य दिशा ओळखणे सोपे होईल.
'या' शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे नियोजनही शक्य
मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांनाही ॲपल मॅप्सचा उपयोग होणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठीही मार्ग नियोजनाची सुविधा उपलब्ध असेल. याच्या मदतीने जवळचे स्थानक शोधणे, प्रवासाचा मार्ग ठरवणे आणि उतरण्याचे स्थानक जवळ आल्यावर सूचना मिळवणे शक्य होईल.
मराठीसह ११ भारतीय भाषांचा समावेश
भारतीय युजर्ससाठी भाषेचा पर्यायही अधिक व्यापक करण्यात आला आहे. इंग्रजी आणि हिंदीमध्ये एकाच वेळी ठिकाणांची नावे पाहता येतील. याशिवाय मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, पंजाबी, ओडिया आणि उर्दू या १० प्रादेशिक भाषांचाही सपोर्ट देण्यात आला आहे.
युजर्सच्या गोपनीयतेचीही काळजी
ॲपलच्या माहितीनुसार, मॅप्स वापरण्यासाठी साइन इन करणे आवश्यक नाही. युजर्सच्या नियमित प्रवासाच्या सवयी समजून घेऊन मार्ग सुचवणारे 'प्रेफर्ड रूट्स' हे फीचर उपकरणावरील बुद्धिमान तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करते. यामध्ये वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
ॲपल मॅप्समधून गोळा होणारी माहिती यादृच्छिक ओळख क्रमांकाशी जोडली जाते. हे क्रमांक ठरावीक कालावधीनंतर बदलले जातात. तसेच युजर्सनी शोधलेल्या ठिकाणांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रक्रिया वापरली जाते, ज्यामुळे ॲपलच्या सर्व्हरवरून युजर्सचे अचूक स्थान ओळखणे शक्य होऊ नये, याची काळजी घेतली जाते.
कोणत्या उपकरणांवर मिळणार नवे फीचर्स?
ॲपल मॅप्सचा हा नवा अनुभव iOS 27.2, iPadOS 27.2, watchOS 27.2 आणि macOS 27.2 किंवा त्यानंतरच्या आवृत्त्यांवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित सॉफ्टवेअर अपडेट असलेल्या आयफोन, आयपॅड, ॲपल वॉच आणि मॅक युजर्सना या नव्या सुविधांचा लाभ घेता येईल.