दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने आज (दि.२७) मोठा निर्णय दिला. कोर्टाने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ जणांची निर्दोष मुक्तता केली. ठोस आणि पुरेशा पुराव्यांशिवाय केवळ आरोपांवर विश्वास ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कोर्टाने तपासातील त्रुटींबद्दल सीबीआयला कडक शब्दांत फटकारले, तसेच सीबीआयच्या तपास अधिकारी (आयओ) यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही दिले. कोर्टाच्या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना, "केजरीवाल भ्रष्ट नाहीये, मी आयुष्यात केवळ इमानदारी कमावलीये" असे म्हणत अरविंद केजरीवालांना रडू कोसळले.
सत्याचा नेहमी विजय होतो
"आज कोर्टाने सर्व आरोप फेटाळले आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आम्ही सतत म्हणायचो की आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचा नेहमी विजय होत असतो. मी न्यायाधीशांचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला न्याय दिला. सत्याचा विजय झाला. मी नेहमी सांगायचो की देव आमच्यासोबत आहे", असे केजरीवाल म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला.
अन् ढसाढसा रडले केजरीवाल
"मोदी आणि अमित शहांनी मिळून स्वतंत्र भारतातील सर्वात मोठं राजकीय षडयंत्र रचलं. आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी पक्षाच्या मोठ्या ५ नेत्यांना तुरूंगात टाकलं गेलं. इतकंच काय तर विद्यमान मुख्यमंत्र्याला त्याच्या घरातून खेचून तुरूंगात टाकण्यात आलं आणि सहा महिने तुरूंगात ठेवलं जे भारताच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं. आमचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुमारे २ वर्ष तुरूंगात ठेवलं, पूर्ण केस खोटी होती. आमच्यावर चिखलफेक करण्यात आली. २४ तास टीव्ही चॅनलवर केजरीवाल भ्रष्ट आहे अशा बातम्या, चर्चा होत होत्या" असं म्हणताच केजरीवालांना अश्रू अनावर झाले.
मी आयुष्यात केवळ इमानदारी कमावलीये - अरविंद केजरीवाल
केजरीवाल यांच्या बाजूला उभ्या असलेल्या मनीष सिसोदिया यांनी त्यांना धीर दिला. पुढे आपले अश्रू आवरत, "केजरीवाल भ्रष्ट नाहीये, मी आयुष्यात केवळ इमानदारी कमावलीये, यांनी खोटी केस टाकली आणि आज हे सिद्ध झालंय...कोर्टाने म्हटलंय...की केजरीवाल अत्यंत प्रामाणिक आहेत, मनीष सिसोदिया अत्यंत प्रामाणिक आहेत, आम आदमी पक्ष कट्टर प्रामाणिक आहे. मला पंतप्रधानांना सांगायचंय की सत्तेसाठी देशासोबत आणि संविधानासोबत अशाप्रकारे खेळू नका. तुम्हाला सत्ता हवीये, तर चांगली कामं करा. आज देशाच्या समोर इतक्या मोठमोठ्या समस्या आहेत. महागाई आहे, बेरोजगारी आहे, देशात सर्वत्र रस्ते तुटलेले आहेत, चारही दिशांना फक्त प्रदूषणच प्रदूषण होतंय, देशात इतक्या समस्या आहेत. त्या समस्यांचं निराकारण करून सत्तेत या ना. केजरीवाल आणि आपवर खोट्या केस कशाला करतात. चांगलं काम करून सत्तेत या, अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करणे आणि २४ तास विरोधकांवर निरर्थक गुन्हे दाखल करणे आणि त्यांना तुरूंगात टाकणे हे एखाद्या पंतप्रधानाला शोभत नाही. अशाने देश पुढे जाणार नाही, जेव्हा जनतेच्या समस्यांचे निराकरण केले जाईल तेव्हाच देश पुढे जाईल.", असे केजरीवाल म्हणाले.
कोणी कितीही ताकदवान झालं तरी देवापेक्षा मोठं कोणी नाही - सुनिता केजरीवाल
मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते. या जगात कोणी कितीही ताकदवान झालं तरी देवापेक्षा मोठं कोणी नाही. मी न्यायाधीशांचेही आभार मानते, ज्यांनी हिंमत दाखवली. अरविंद केजरीवाल संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे जगले आणि या देशाने खूप प्रगती करावी हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे. पण, या लोकांनी सत्तेच्या लालसेपोटी आमच्यावर अनेक खोटे आरोप केले, अरविंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरूंगात टाकलं, खूप त्रास दिला. मात्र, देव साथ देईल आणि सत्याचा विजय होईल असा मला विश्वास होता, असे अरविंद केजरीवला यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल म्हणाल्या.
सत्यमेव जयते! आज पुन्हा एकदा मला...; सिसोदियांची सोशल मीडियावर प्रतिक्रिया
दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "सत्यमेव जयते...आज पुन्हा एकदा, मला बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारसरणीचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अभिमान वाटतो. मोदींच्या संपूर्ण पक्षाने आणि सर्व एजन्सींनी आम्हाला बेईमान म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही, आज हे सिद्ध झाले आहे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे अत्यंत प्रामाणिक आहेत."
सीबीआय उच्च न्यायालयात जाणार
दरम्यान, राऊस ॲव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात जाणार आहे. तपासाच्या अनेक पैलूंकडे कनिष्ठ न्यायालयाने "दुर्लक्ष केले किंवा त्यांचा पुरेसा विचार केला नाही", असे सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले असून तात्काळ हायकोर्टात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.