गुवाहाटी : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी मिनीबस आणि कंटेनर ट्रकची भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात २४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
अपघातग्रस्त मिनीबस गोळाघाटहून नागावकडे जात होती, तर कंटेनर ट्रक अप्पर आसामच्या दिशेने जात होता. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ लागू असलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करून मिनीबस वेगाने धावत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कंटेनर ट्रकला जाऊन धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. कोहोरा परिसरातील हथीकुली चहामळ्याजवळ रंगानजा येथे हा अपघात घडला, मृतांचा आकडा वाढत असून, डॉक्टरांनी २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. डॉक्टरांनी २० जणांना पुढील उपचारासाठी जोरहाट येथे पाठवले आहे.
सर्व वरिष्ठ नागरी आणि पोलीस अधिकारी मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याबाबत तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही. आसामचे पंचायत व ग्रामीण विकासमंत्री अतुल बोरा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मदत व बचाव कार्याची पाहणी केली. या अपघाताबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
जखमींना वेळेवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, गोळाघाट जिल्हा प्रशासनाने वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते का, याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.