राष्ट्रीय

Ram Mandir Flag Hoisting: ध्वजारोहणासाठी अयोध्या नगरी सजली, कडक सुरक्षा तैनात; उद्या होणाऱ्या कार्यक्रमात मोबाईल बंदी

राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूट उंच स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद धर्मध्वज फडकवण्यात येणार आहे.

Swapnil S

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरावर मंगळवारी ध्वजारोहण करण्यात येणार असून ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूट उंच स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद धर्मध्वज फडकवण्यात येणार आहे.

धर्मध्वज फडकविण्यासाठी स्वयंचलित व्यवस्था बसवण्यात आली आहे. या ध्वजारोहण सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली असून ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राम मंदिरात पहिल्यांदाच राम-सीता विवाह उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी अंदाजे ८,००० लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापैकी २,५०० लोकांना सामावून घेण्यासाठी तीर्थपुरममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना सकाळी ८ ते १० च्या दरम्यान मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे.

पाहुण्यांना मोबाईल आणण्याची परवानगी नाही, दिल्ली स्फोटानंतर मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. देश आणि जगभरातून अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी ५,००० हून अधिक खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येतील प्रमुख मंदिरांमधून भव्य राम मिरवणूक काढण्यात येईल. संपूर्ण अयोध्येतील कनक भवन, मणिरामदास छावणी, रामवल्लभकुंज, रंगमहल, जानकी महाल, श्री रामदर्शन कुंज आणि लक्ष्मण किल्ला यासह १२ मंदिरांमधून भगवान रामाची मिरवणूक काढली जाणार आहे.

पॅराशूट कापडापासून बनवला ध्वज

राम मंदिरात फडकवला जाणारा ध्वज अहमदाबादमधील कारागिरांनी बनवला आहे. हा ध्वज एका खास नायलॉन पॅराशूट फॅब्रिकपासून बनवला आहे. या ध्वजाला ऊन, वारा, पाऊस यापासून काहीही नुकसान होणार नाही. हा ध्वज उंच ठिकाणी असल्याने तो अयोध्येत पोहोचल्यानंतर दूरवरून नजरेस पडणार आहे.

पंतप्रधान मोदी तीन तास अयोध्येत

मोदींचा अयोध्या दौरा तीन तासांचा असेल. ते सकाळी ११ वाजता राम मंदिरात पोहोचतील. ते हनुमानगढीला भेट देतील आणि तेथे पूजा करतील. ते रामलल्ला आणि राम दरबारालाही भेट देऊन आरती करतील. पंतप्रधान सप्त मंदिर परकोटा, शेषावतार मंदिर आणि रामायणातील श्री डी भित्तिचित्रांनाही भेट देतील. त्यानंतर ते मंदिरासाठी काम करणाऱ्या अभियंते आणि कामगारांना भेटणार आहेत.

महायज्ञाचे संचलन नाशिकच्या वेदमूर्तींकडे

नाशिकमधील महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानचे प्रधान अध्यापक वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी यांच्यावर सर्व विधी-पूजा कर्म सांगण्याची जबाबदारी यज्ञ समितीने सोपवली आहे. वेदमूर्ती रवींद्र पैठणे यांनी अयोध्येत झालेल्या २२ जानेवारीच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी यजुर्वेदाच्या स्वाहाकाराचे १०८ वैदिक विद्वानांसमवेत पूर्ण संचलन केले होते.

मुंबई महापालिकेत बदली घोटाळ्याचे सत्र कायम; ५५ अधिकाऱ्यांची पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे जलवाहतूक बंद; २६ मेपासून सेवा स्थगित

Mumbai : आश्रय योजनेला CRZ च्या मंजुरीची प्रतीक्षा; मंजुरीसाठी मकरंद नार्वेकरांचे एमसीझेडएमएला पत्र

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प : विक्रोळीत ३५० टनी महाकाय कटरहेड भुयारात दाखल; मिठी नदीखाली खोदणार बोगदा

Mumbai : पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जनगणनेचे काम; म्युनिसिपल मजदूर युनियनचा तीव्र विरोध