फोटो - एएनआय
राष्ट्रीय

RCB च्या IPL विजयी परेडला गालबोट; बंगळुरूत चेंगराचेंगरीचे ११ बळी, अनेकजण जखमी

Bengaluru Stampede : तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे विजेतेपद जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाचे बुधवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, या विजयी परेडला चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. यावेळी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी...

Swapnil S

बंगळुरू : तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे विजेतेपद जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाचे बुधवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, या विजयी परेडला चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. यावेळी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच ५० हून अधिक जण जखमी झाल्याने विजयानंतरचा सत्कार सोहळा काही मिनिटांतच आटोपण्यात आला. जखमींमध्ये काही अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएलच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्ज इलेव्हनचा पराभव करत १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद मिळवले. या विजयी संघाचा सन्मान करण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बुधवारी संध्याकाळी चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आरसीबीच्या दर्दी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करताना चेंगराचेंगरी झाली. यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी आरसीबीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळल्याने काही चाहत्यांना प्राण गमवावे लागले.

विराट कोहलीसह अनेकांना पाहण्यासाठी पाऊस असतानाही विधान सौध ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी हजेरी लावली होती. चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून अरुंद गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला अन् एकच गोंधळ उडाला. चिन्नास्वामी स्टेडियमची आसनक्षमता ३० ते ३२ हजार इतकी आहे. पण स्टेडियमबाहेर लाखोंची गर्दी झाल्याने त्यांना आवरणे सुरक्षारक्षकांनाही जमले नाही.

गर्दीमुळे चाहते चक्क स्टेडियमबाहेरील वाहनांवर चढले. त्यात वाहनांचेही मोठे नुकसान झाले. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी होऊन काही जण खाली पडले. तेव्हा अनेक जण गर्दीतून सुटका करण्यासाठी पळू लागले. खाली पडलेले सगळेच जण धावणाऱ्यांच्या पायाखाली आले आणि या सगळ्या गोंधळात अनेक जण जखमी झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या प्रकारानंतर पोलिसांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला स्टेडियममध्ये सुरू असलेला विजयी समारंभ ३० मिनिटांत संपवण्याचे आदेश दिले. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे आरसीबीच्या विजयी जल्लोषावर विरजण पडले.

दरम्यान, या दुर्घटनेवरून कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर भाजपने जोरदार टीका केली. ‘काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे भाजपने म्हटले आहे.

चेंगराचेंगरीची घटना हृदयद्रावक - मोदी

“बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना देवाकडे करतो,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

चिन्नास्वामी स्टेडियम येथील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.

विजयाचा आनंद नाहीसा झाला - सिद्धरामय्या

आरसीबी संघ विजेतेपदाच्या चषकासह विधानसभेत पोहोचला, तेव्हा विधानसभेबाहेर एक लाख लोक जमले होते. विधानसभेत जल्लोष सुरू होता, पण चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. स्टेडियमबाहेर ३ लाख लोक जमले होते. आम्हाला एवढ्या मोठ्या गर्दीची अपेक्षा नव्हती. कोणीही याची अपेक्षा केली नव्हती. आम्ही यासाठी तयार नव्हतो. या दुर्घटनेने विजयाचा आनंद नाहीसा झाला. सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. यानंतर क्रिकेट असोसिएशनने जबाबदारी घ्यायला हवी होती. स्टेडियममध्ये एक छोटासा प्रवेशद्वार होता. तिथे खूप लोक जमले होते. त्यांनी दरवाजा तोडला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली., अशी कबुली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video