उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम; देशभरातील शाळांमध्ये होणार भारतीय भाषा समर कॅम्प, वाचा सविस्तर  (Photo-X/@EduMinOfIndia)
राष्ट्रीय

उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम; देशभरातील शाळांमध्ये होणार भारतीय भाषा समर कॅम्प, वाचा सविस्तर

पारंपरिक वर्गशिक्षणाऐवजी संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना विविध भारतीय भाषांमधील मूलभूत संवाद कौशल्ये शिकवण्यावर भर दिला जाणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळी सुट्टीदरम्यान देशभरातील शाळांमध्ये शिक्षण मंत्रालयातर्फे 'भारतीय भाषा समर कॅम्प २०२६' आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आठवडाभर विविध भारतीय भाषा अधिक रंजक आणि अनौपचारिक पद्धतीने शिकण्याची संधी मिळणार आहे.

सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या उपक्रमाबाबत शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, पारंपरिक वर्गशिक्षणाऐवजी संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना विविध भारतीय भाषांमधील मूलभूत संवाद कौशल्ये शिकवण्यावर भर दिला जाणार आहे.

संवाद, शब्दसंग्रह आणि संस्कृतीवर भर

या कार्यक्रमामध्ये:

  • स्वतःची ओळख करून देणे

  • शब्दसंग्रह वाढवणे

  • दैनंदिन संभाषण

  • सांस्कृतिक जाणीव वाढवणे

यांसारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे.

शाळांना उन्हाळी सुट्टीचा उपयोग करून विद्यार्थ्यांसाठी भारतातील भाषिक वैविध्य समजून घेण्यास मदत करणारे वातावरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बहुभाषिक शिक्षणाला चालना

गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय भाषा समर कॅम्पला मोठा प्रतिसाद मिळाला होता. देशभरातील ५.१३ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.

हा उपक्रम सर्वप्रथम २०२५ मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरू केला होता. मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे २०२६ मध्ये हा कार्यक्रम देशभरातील शाळांमध्ये राबवण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.

यंदा भारतीय सांकेतिक भाषेचाही समावेश

यंदाच्या कॅम्पमध्ये भारतीय सांकेतिक भाषा (ISL) या नव्या घटकाचाही समावेश करण्यात आला आहे. समावेशक शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत समान आणि बहुभाषिक शिक्षणावर देण्यात आलेला भर या उपक्रमाशी

सुसंगत असल्याचे सांगितले जात आहे.

सात दिवसांचा विशेष कार्यक्रम

शिक्षण मंत्रालयाने आठवडाभर चालणाऱ्या या कॅम्पसाठी दिवसनिहाय उपक्रम निश्चित केले आहेत.

  • पहिला दिवस - सामान्य अभिवादन, वर्णमाला, अंक, स्वाक्षरी आणि मूलभूत ओळख.

  • दुसरा दिवस - व्हर्च्युअल शहरभ्रमण आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्यक्ष संभाषणाचे उपक्रम.

  • तिसरा दिवस - संगीत, नृत्य आणि चित्रकलेच्या माध्यमातून कला-आधारित शिक्षण.

  • चौथा दिवस - विविध भाषांमधील स्थानिक पदार्थ, साहित्य, भाज्या आणि फळांची नावे शिकणे.

  • पाचवा दिवस - संस्कृतीचा आदर, ऐकण्याची क्षमता आणि स्थानिक वीरांविषयी जागरूकता वाढवणारे उपक्रम.

  • सहावा दिवस - नद्या, पर्वत आणि महत्त्वाच्या स्थळांच्या नावांच्या माध्यमातून इतिहास आणि भूगोल समजून घेणे.

  • सातवा दिवस - प्रोत्साहन, अनुभव शेअर करणे आणि समारोप उपक्रम.

व्याकरणाऐवजी आनंदातून भाषा शिक्षण

अधिकाऱ्यांच्या मते, या कॅम्पचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्याकरणाचा ताण न देता आनंददायी पद्धतीने भाषा शिकवणे हा आहे. देशातील विविध भागांमध्ये वापरले जाणारे शब्द, उच्चार आणि संवादपद्धती विद्यार्थ्यांना अनुभवता याव्यात, यावर भर दिला जाणार आहे.

देशातील सर्वात मोठ्या भाषा उपक्रमांपैकी एक ठरण्याची शक्यता

देशभरातील शाळा या कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळे 'भारतीय भाषा समर कॅम्प २०२६' हा भारतीय शाळांमधील सर्वात मोठ्या भाषा उपक्रमांपैकी एक ठरू शकतो. काही विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घरात किंवा शाळेत वापरल्या जाणाऱ्या भाषांव्यतिरिक्त इतर भारतीय भाषांशी होणारी ही पहिली ओळख असू शकते.

माथेरानमध्ये Use & Throw रेनकोटवर बंदी; प्लास्टिकमुक्त पर्यटनासाठी ठोस पावले

११ वर्षांपूर्वी कामावरून काढलेल्या पाच अभियंत्यांना पुन्हा कामावर घ्या! उच्च न्यायालयाचे पुणे पालिकेला आदेश

पदव्युत्तर अभ्यासक्रमात पहिल्यांदाच चौथे वर्ष ऑनर्स; ऑनर्स विथ रिसर्चचा पर्याय, ३ जूनला पहिली गुणवत्ता यादी

दक्षिण मुंबईतील पार्किंगची समस्या होणार दूर; आणखी एक भूमिगत रोबोटिक पार्किंगची सुविधा

Nashik : द्वारका सर्कल ते नाशिक रोड महामार्ग रुंदीकरणाला मान्यता; वाहतूककोंडीवर दिलासा मिळण्याची शक्यता