आज (१८ सप्टेंबर) रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. संसद अधिवेशनाचा दुसरा दिवस नव्या संसदेतून सुरु होणार आहे. हे विशेष अधिवेशन सत्र संसदेच्या नवीन इमारतीमध्ये भरवण्यात येणार आहे. पण यापार्श्वभूमीवर जुन्या संसद भवनाला शेवटचा निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण करत संसद भावनाच्या ऐतिहासिक क्षणांना उजाळा दिला. "तसंच नव्या भवनात आता आपण जाणार आहोत. पण हे जुनं संसद भवन पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिलं", असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
मोदी म्हणाले, "जुन्या संसदेला स्मरण करताना आणि नव्या भवनात जाण्यापूर्वी इतिहासाच्या त्या प्रेरक महत्वपूर्ण क्षणांना स्मरण करुन आपण पुढे जातं आहोत. या ऐतिहासिक भवनाला आपण निरोप देत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे भवन इम्पिरिअल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलचं काम करत होतं, स्वातंत्र्यानंतर त्याला संसद भवनाचा दर्जा मिळला.
ही इमारत उभारण्याचा निर्णय विदेशी खासदारांचा होता. पण आम्ही हे कधीही विसरु शकत नाही आणि गर्वानं सांगू शकतो की, या संसद भवनात परिश्रम, घाम माझ्या देशवासियांनी गाळला होता. तसंच पैसे देखील माझ्या देशाच्या लोकांचे होते. गेल्या ७५ वर्षांच्या या यात्रेनं अनेक लोकशाही परंपरांची टिकवणूक केली आहे.
आपण आता नव्या भवनात जाणार आहोत पण हे जुनं संसद भवन देखील पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिल. हा भारताच्या लोकशाहीच्या स्वर्णिम प्रवासाचा भाग आहे. भारताच्या रक्तात लोकशाहीचं सामर्थ्य कसं आहे याची आठवण या संसद भवनापासून कायम होत राहिल. अमृत काळातील पहिली पहाट, राष्ट्राला नवा आत्मविश्वास, नवा प्रण, नवं सामर्थ्यानं भरणार आहे. आज चारी बाजूंनी भारतीयांची चर्चा होत आहे", असं देखील पंतप्रधान म्हणाले.