केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रातील अनेक शहरांत छापे टाकून पीएफआयशी संबंधित २० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील काही जणांना अटक करण्यात आली असून या आरोपींच्या चौकशीत संघ व भाजपचे बडे नेते ‘पीएफआय’च्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याचे महाराष्ट्र एटीएसच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय पीएफआयच्या रडारवर होते. ‘पीएफआय’च्या सदस्यांनी दसऱ्याच्या दिवशी ‘आरएसएस’च्या पथ संचलनाची माहितीही गोळा केली होती. मात्र, कोणत्या प्रकारचा कट ‘पीएफआय’ सदस्यांनी आखला होता, याबद्दलची माहिती एटीएसने दिली नाही. मात्र, ‘आरएसएस’सह भाजपचे अनेक बडे नेते ‘पीएफआय’च्या रडारवर होते. या नेत्यांना टार्गेटवर ठेवूनच आरोपी काम करत होते, असे सुत्रांनी सांगितले. दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने तरुणांची माथी भडकवण्याचे काम हे संशयित करत होते. त्यांना दहशतवाद्यांकडून पैसा पुरवला जात असल्याचा एटीएसच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
‘पीएफआय’चे औरंगाबाद होते मुख्यालय
२००६ मध्ये केरळमध्ये सुरू झालेल्या ‘पीएफआय’ संघटनेचे देशभरात जाळे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आदी शहरांत त्यांचे काम चालते. सुरुवातीच्या काळात संघटनेने मुख्यालय औरंगाबादला बनवून इथूनच राज्यभर कारवाया सुरू करण्यात आल्या होत्या. देशाविरोधात आणि समाजविघातक कारवाया केल्याच्या संशयावरून नुकतीच देशभरातून ‘पीएफआय’च्या शेकडो सदस्यांना अटक केली आहे.