पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला. या टप्प्यात १२१ मतदारसंघांत ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता प्रचार संपण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन सभांना संबोधित केले, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाच सभा घेतल्या. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही सभा घेतली आणि रोड शोचे नेतृत्व केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीन सभांमध्ये भाषण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप महिला कार्यकर्त्यांशी आभासी संवाद साधला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही सभांना संबोधित केले, तर राजदचे तेजस्वी यादव यांनी दिवसभर अनेक सभा घेतल्या.
शेवटच्या दिवशी प्रचार करणाऱ्यांमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा समावेश होता.
पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या प्रमुख मतदारसंघांमध्ये तेजस्वी यादव यांचा राघोपूर, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा तारापूर मतदारसंघ यांचा समावेश आहे. गायिका मैथिली ठाकूर अलीनगर, उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांचा लखीसराय, मोकामा, रघुनाथपूर आदी मतदारसंघांमध्ये महत्त्वाच्या लढती होणार आहेत. २४३ सदस्यीय विधानसभेतील उर्वरित १२२ जागांसाठी मतदान ११ नोव्हेंबर रोजी होईल आणि मतमोजणी १४ नोव्हेंबरला होईल.