Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या अडचणीत वाढ; पाण्याच्या नमुन्यात बॅक्टेरिया, FSSAI कडून पुन्हा कारवाई 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या अडचणीत वाढ; पाण्याच्या नमुन्यात बॅक्टेरिया, FSSAI कडून पुन्हा कारवाई

बाटलीबंद पिण्याचे पाणी बाजारात विक्रीसाठी आणण्यापूर्वी त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता निर्धारित मानकांनुसार असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडून वेळोवेळी नमुने घेऊन तपासणी केली जाते.

किशोरी घायवट-उबाळे

बाहेर कुठे पाणी प्यायचे असेल तर अनेक जण बिस्लेरीसारख्या नामांकित ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याला पसंती देतात. मात्र, आता याच बिस्लेरीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात कोलिफॉर्म जीवाणू आढळले आहेत. या प्रकरणाची प्राथमिक आणि संदर्भ प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिस्लेरीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्यातील उत्पादन प्रकल्पाशी संबंधित प्रकरणातही कंपनीविरोधात कारवाईला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे बिस्लेरीच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील पाण्याच्या नमुन्यात जीवाणू

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यातील तेलीपारा गावात असलेल्या बिस्लेरीच्या उत्पादन प्रकल्पातून बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा नमुना घेण्यात आला होता. या नमुन्याच्या प्राथमिक प्रयोगशाळेत तपासणीत कोलिफॉर्म जीवाणू आढळले. त्यानंतर संदर्भ अन्न प्रयोगशाळेतही या निष्कर्षांची पडताळणी झाली. दोन्ही तपासण्यांमध्ये जीवाणूंची उपस्थिती आढळल्याने पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वृत्तांनुसार, संबंधित पाण्याच्या बॅचचा ओळख क्रमांक पीबी २०१ असा असून, या बॅचचे उत्पादन २० जुलै २०२६ च्या सुमारास करण्यात आले होते. तपासणीतील निष्कर्ष समोर आल्यानंतर १२ ऑगस्ट २०२६ रोजी या बॅचच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत कंपनीविरोधात खटला चालवण्यास FSSAI ने मंजुरी दिली.

पाण्यात कोलिफॉर्म जीवाणू आढळणे म्हणजे काय?

पाण्यातील संभाव्य दूषितीकरण ओळखण्यासाठी कोलिफॉर्म जीवाणूंचा निर्देशक म्हणून वापर केला जातो. पाण्याच्या नमुन्यात हे जीवाणू आढळल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सांडपाण्याची गळती, खराब जलवाहिन्या किंवा इतर मार्गांनी बाहेरील जीवाणू पाण्यात मिसळल्यास असे दूषितीकरण होऊ शकते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अशा तपासण्या महत्त्वाच्या मानल्या जातात.

गोव्यातील प्रकरणानंतर पश्चिम बंगालमध्येही कारवाई

बिस्लेरीसाठी ही पहिलीच अडचण नाही. काही दिवसांपूर्वी गोव्यातील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाशी संबंधित स्वतंत्र प्रकरणातही FSSAI ने खटला चालवण्यास मंजुरी दिली होती. त्या प्रकरणात पाण्याच्या नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचे वृत्त होते. त्यामुळे संबंधित नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला होता.

यानंतर संदर्भ प्रयोगशाळेतील तपासणीत पाण्यात पॉलीन्यूक्लिअर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAH) हे पदार्थही आढळल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाण्याच्या सुरक्षिततेबाबत आणखी प्रश्न उपस्थित झाले. आता पश्चिम बंगालमधील नव्या प्रकरणामुळे कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेवर आणि गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेवर पुन्हा लक्ष केंद्रित झाले आहे.

बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष

बाटलीबंद पिण्याचे पाणी बाजारात विक्रीसाठी आणण्यापूर्वी त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता निर्धारित मानकांनुसार असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडून वेळोवेळी नमुने घेऊन तपासणी केली जाते. या तपासण्यांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

बिस्लेरीचा FSSAI च्या अहवालावर आक्षेप; पुनर्तपासणीची मागणी

दरम्यान, या प्रकरणावर बिस्लेरी इंटरनॅशनलने २८ नोव्हेंबर रोजी अधिकृत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, संबंधित PB201 बॅचमधील पाण्याचे नमुने दोन स्वतंत्र आणि FSSAI मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले होते.

या दोन्ही प्रयोगशाळांच्या अहवालांमध्ये नमुने कोलिफॉर्म जीवाणूंसाठी निर्धारित मानकांनुसार योग्य असल्याचे आढळले आहे.

FSSAI च्या प्रयोगशाळांचे निष्कर्ष आणि स्वतंत्र प्रयोगशाळांचे अहवाल यामध्ये तफावत असल्याने या प्रकरणाची सखोल पुनर्तपासणी करावी, अशी मागणी कंपनीने केली आहे. नमुने गोळा करण्याची पद्धत, तपासणीची प्रक्रिया आणि प्रयोगशाळांचे निष्कर्ष यांची समान निकषांवर पडताळणी करण्याचे आवाहनही बिस्लेरीने केले आहे. तसेच कंपनीने आपल्या उत्पादनांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असल्याचे सांगत, नियामक संस्थांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका मांडली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : घाटकोपर रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! महिलांच्या शौचालयात ६० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत

Mumbai : पवई, भांडुपमधील १८९ झाडे बाधित; हरकती, सूचना नोंदवा; BMC चे आवाहन

Mumbai : कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती; प्रकल्प कार्यालय, संमती नोंदणी केंद्र आणि नमुना सदनिकेचे उद्घाटन

Jalgaon : तरुणीच्या अन्ननलिकेत अडकली पिन; १८ वर्षीय तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया

Pune : शांतता, पुणेकर वाचत आहेत...८ डिसेंबरला; शहराला वाचन चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न