दिल्लीच्या पटपडगंज परिसरातील भाजप नगरसेविका रेणू चौधरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रेणू चौधरी सार्वजनिक उद्यानात एका दक्षिण आफ्रिकन नागरिकाला हिंदी येत नसल्यामुळे जाब विचारताना आणि धमकावताना दिसत आहेत. संबंधित आफ्रिकन वंशाचा नागरिक अनेक वर्षांपासून त्या परिसरात मुलांना फुटबॉल प्रशिक्षण देत आहे.
“एका महिन्यात हिंदी शिकली नाही, तर...
व्हायरल क्लिपमध्ये रेणू चौधरी पटपडगंज येथील एका पार्कमध्ये उपस्थित असलेल्या लोकांशी आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. या ठिकाणी अनेक वर्षांपासून स्थानिक मुलांना फुटबॉल प्रशिक्षण देणारा दक्षिण आफ्रिकन प्रशिक्षकही उपस्थित होता. हिंदी भाषेत जोरजोरात बोलत त्या परदेशी नागरिकाने अजून हिंदी का शिकली नाही, असा सवाल करताना दिसतात. व्हिडिओमध्ये चौधरी संबंधित व्यक्तीला गंभीर इशारा देताना ऐकू येतात. “एका महिन्यात हिंदी शिकली नाही, तर हा पार्क त्याच्याकडून काढून घ्या (सरावासाठी पार्कची जागा दिली जाणार नाही),” असे त्या म्हणतात.
“इथला पैसा खाताय (कमवताय), तर तोंडातून हिंदीही बोलायला शिका.”
वादाच्या दरम्यान, “तुम्ही माझ्या बोलण्याला अजिबात गंभीरपणे घेत नाही. याने हिंदी का शिकली नाही? पुढच्या एका महिन्यात हिंदी शिकली नाही, तर याच्याकडून पार्क काढून घ्या.” यावेळी त्या पुढे म्हणतात, “ही हसण्याची गोष्ट नाही, मी खूप गंभीरपणे बोलतेय.” तसंच, भाषा आणि उपजीविकेचा संबंध जोडत त्या म्हणतात, “इथला पैसा खाताय (कमवताय), तर तोंडातून हिंदीही बोलायला शिका.” असेही त्या म्हणतात.
व्हिडिओमध्ये रेणू चौधरी सांगतात की, हा मुद्दा त्यांनी आठ महिन्यांपूर्वीही उपस्थित केला होता. मात्र, सोसायटीतील लोकांनी हा कोच त्यांच्या मुलांना प्रशिक्षण देतो, असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याला तेव्हा माफ केले होते, असाही दावा त्या करतात. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात रेणू चौधरी एका व्यक्तीकडे बोट दाखवत पार्कच्या नियमांबाबत इशारा देताना दिसतात. त्या म्हणतात,
“मी सांगतेय, रात्री आठ वाजता पार्क बंद झालं पाहिजे. इथे काहीही गुन्हेगारी प्रकार घडला, तर त्याची जबाबदारी तुमची असेल.”
नेटकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी रेणू चौधरी यांच्या वर्तनावर टीका करत हे उद्धटपणाचे, दादागिरीचे आणि सत्तेचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. काही युजर्सनी याला केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी केलेली ‘रीलबाजी’ असल्याचाही आरोप केला आहे. या घटनेनंतर भाषा लादण्याच्या मुद्द्यावरही चर्चा रंगली आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, अनेक वर्षांपासून मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या परदेशी नागरिकावर हिंदी शिकण्याची सक्ती का केली जाते? भारतातून परदेशात काम करणाऱ्या लोकांना तिथल्या भाषेची अशी सक्ती केली जाते का, असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.