राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत भाजप सत्ता गमावणार - सत्यपाल मलिक

मोदी सरकार २०२४ सालची लोकसभा निवडणूक सामान्यपणे होऊ देणार नाही, हे पटवून देतांना मलिक यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे उदाहरण दिले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव होऊन हा पक्ष सत्तेबाहेर होईल, असा दावा जम्मू काश्मीर आणि गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. आपल्या निवासस्थानी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी सुमारे अर्धा तास गप्पा मारल्या, त्या दरम्यान त्यांनी हा दावा केला आहे.

मलिक म्हणाले, ‘‘गांधीजींच्या विचारातील उदार हिंदुत्ववाद टिकला तरच भारत देश तरू शकेल. हिंदुत्वाच्या दोन बाजू आहेत. त्यापैकी एक बाजू म्हणजे अहिंसा आणि बंधुत्व तर दुसरी म्हणजे तिरस्कार व हिंसाचार, ज्याचे आचरण भाजप आणि आरएसएस करीत आहे. तसेच मोदी सरकारबाबत मलिक म्हणाले, ‘‘हे सरकार शेतकऱ्यांना शेतीपासून दूर हुसकावून लावत असून कॉर्पोरेट उद्योगांना या क्षेत्रात प्रवेश देत आहे. अदानी पंजाब व हरयाणा राज्यात वखारी बांधण्यासाठी २० हजार कोटी रुपये गुंतवणूक करीत आहे. येथे धान्य साठा करुन तो नंतर चढ्या भावाने विकण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अदानी ऐवजी सरकारने गोदामे उभारण्याची गरज आहे,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच बाजारात शेतमालाचा भाव कमालीचा खाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नेहरुंनी हमी भाव पद्धत सुरू केली होती, याची त्यांनी आठवण करुन दिली. मलिक काही काळ मेघालयाचे देखील राज्यपाल होते. ते म्हणाले, ‘‘इशान्य भारत शांत होता, मोदी सरकारने शांततेचा भंग केला. मणिपूरच्या घटनेवरुन सरकारचे अपयश स्पष्ट होते. तेथे मुख्यमंत्री काही करु शकत नाहीत तरी देखील त्यांना पदच्यूत केले जाऊ शकत नाही, हे दिसून आले आहे.’’

मोदी सरकार २०२४ सालची लोकसभा निवडणूक सामान्यपणे होऊ देणार नाही, हे पटवून देतांना मलिक यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे उदाहरण दिले. पुलवामा दुर्घटना ही आपली चूक होती. अनेक महिन्यांपासून सीआरपीएफच्या जवानांना हलवण्यासाठी पाच विमानांची मागणी करण्यात आली होती, कारण जमिनीवरुन वाहतूक धोकादायक होती. तरी देखील सरकारकडून विमानांची मागणी पूर्ण करण्यात आली नाही, अशा शब्दात मलिक यांनी खेद व्यक्त केला. त्यांच्या मते लोकसभा निवडणूक लक्षात ठेवूनच पुलवामा घटना घडवून आणली होती.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल