कर्करोगाची १३७ औषधे झाली स्वस्त; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती तीव्र नाराजी, २७००रु. चे औषध २७००० ला मिळणे हे नरसंहारासारखेच... 
राष्ट्रीय

कर्करोगाची १३७ औषधे झाली स्वस्त; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती तीव्र नाराजी, २७००रु. चे औषध २७००० ला मिळणे हे नरसंहारासारखेच...

कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने १३७ कर्करोगविरोधी औषधांच्या किमती तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. औषध किमतींचे नियमन करणाऱ्या राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने व्यापारी नफ्याची मर्यादा ३० टक्क्यांवर निश्चित केल्याने या औषधांचे दर ९ नोव्हेंबरपासून लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने १३७ कर्करोगविरोधी औषधांच्या किमती तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. औषध किमतींचे नियमन करणाऱ्या राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने व्यापारी नफ्याची मर्यादा ३० टक्क्यांवर निश्चित केल्याने या औषधांचे दर ९ नोव्हेंबरपासून लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये अनेक पेटंटेड औषधांचाही समावेश आहे.

औषध कंपन्यांनी १२१ औषधांच्या १,३६४ फॉर्म्युलेशन्सच्या नव्या किमती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ६७९ ब्रँडच्या औषधांच्या किमती ५०% पेक्षा जास्त कमी करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ९६.४५% कपात करण्यात आली आहे. किमती कमी झाल्यामुळे रुग्णांची दरवर्षी सुमारे ३,५४०.३८ कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे. औषध विक्रेते आणि वितरकांच्या अवाजवी नफेखोरीला चाप लावण्यासाठी 'डीपीसीओ २०१३'च्या नियम १९ चा वापर करून एनपीपीएने हा आदेश जारी केला आहे. किरकोळ विक्रेत्यांची खरेदी किंमत आणि रुग्णांकडून वसूल केली जाणारी छापील किंमत यांमध्ये १० पटींपर्यंत प्रचंड फरक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने हे ठोस पाऊल उचलले आहे.

हा तर भरदिवसा दरोडा...

वास्तविक, २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्करोगावरील औषधांच्या किरकोळ विक्री किंमती आणि कमाल किरकोळ किंमत म्हणजेच 'एमआरपी' यांच्यातील मार्जिनवर प्रश्न उपस्थित करून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने म्हटले होते, '२७००रु. किमतीचे औषध रुग्णाला २७०००रु. मध्ये मिळणे म्हणजे भरदिवसा दरोडा आणि नरसंहारासारखे आहे'.

प्राधिकरणाने नफा ३०% निश्चित केला

सर्वोच्च न्यायालयाच्या नाराजीनंतर १७ ऑक्टोबर रोजी 'नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी'ने १३७ गैर-अनुसूचित (नॉन-शेड्यूल्ड) कर्करोगावरील औषधांवर कंपन्यांचा नफा ३०% निश्चित केला होता. या निर्णयानंतरच औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत.

तज्ज्ञ समितीने केली होती शिफारस

किमती कमी करण्याची शिफारस 'डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस' अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने केली होती. या समितीत देशभरातील प्रमुख ऑन्कोलॉजिस्ट, वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्णालयांमधील तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश होता. तसेच मार्जिन तर्कसंगत करण्यासाठी समितीने १३७ औषधांची शिफारस केली आहे. या यादीत वेळोवेळी अद्ययावत बदल केले जातील.

अनेक महागड्या औषधांचे दर घसरणार

काही गंभीर कर्करोगांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या एका बॉटलची किंवा पॅकची किंमत सध्या ५ लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये 'पर्तुझुमॅब + ट्रास्टुझुमॅब', 'अटेझोलिझुमॅब', 'टेक्लिस्टामॅब', 'इनोटुझुमॅब ओझोगामिसिन' आणि 'डाराटुमुमॅब' यांसारख्या महागड्या औषधांचा समावेश आहे. नव्या निर्णयामुळे या अत्यंत महागड्या औषधांच्या किमतीत मोठी घसरण होऊन ती सर्वसामान्य रुग्णांच्या आटोक्यात येण्यास मदत होईल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार

'रॉकेटबाजी'वर बंदी! आकाशात उडणारे फटाके फोडण्यास मनाई; गच्ची, गॅलरी, झोपडपट्ट्यांसह सार्वजनिक, खासगी ठिकाणी निर्बंध

Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या

भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू; धाराशिवमध्ये दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील एकमेव बचावला

IND vs NZ 3rd ODI: पाडव्याला पावसाचे पारडे जड! भारताचा आज हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना