नवी दिल्ली : ‘मी माझ्या आयुष्यासाठी लढत होतो, पण प्रवाशांना मरू न देण्याचा माझा ठाम निर्धार होता, असे फ्लाय दुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना सांगितले. विमान हवेत असताना सह-वैमानिकाने केलेल्या हल्ल्यानंतरचे भयानक प्रसंग सांगत त्यांनी विमानाचे कसे रक्षण केले, याचा थरारक अनुभव शेअर केला. सध्या संयुक्त अरब अमिरातीमधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या वैमानिकाशी पंतप्रधान मोदींनी व्हिडीओकॉलवरून संवाद साधला.
पंतप्रधान मोदींनी या वैमानिकाच्या धैर्याचे, प्रसंगावधानाचे आणि संयमाचे कौतुक केले. स्मित यांनी सेकंदात घेतलेल्या निर्णयामुळे अनेक लोकांचे प्राण वाचल्याचे मोदी म्हणाले.
मला जाणवले की विमान खाली चालले आहे आणि जर मी काही केले नाही, तर.... माझ्याकडे जेवढी ऊर्जा उरली होती. मी खाली पडलो असताना शेवटचा जोर लावला. दार अगदी जवळच होते. सतत होणारे वार सहन करत असतानाही मी कसेबसे दार उघडू शकलो. कॉकपिटचे दार उघडल्यानंतर इतर सर्वजण आत आले आणि प्रत्येकाने तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली, असे मच्छार यांनी नमूद केले.
पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी जगण्याच्या जिद्दीने वागत होतो, पण त्याच वेळी मला ठाऊक होते की मी या प्रवाशांना मरू देऊ शकत नाही," असे ते म्हणाले.
देवानेच माझे रक्षण केले-स्मित
हनुमान चालिसाबद्दल बोलताना स्मित यांनी पंतप्रधानांना सांगितले, ‘जेव्हा जेव्हा मला वेदना जाणवतात, तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट येते, मी फक्त हनुमान चालिसा म्हणतो. अगदी त्या क्षणीही मी फक्त हनुमान चालिसाच म्हणत होतो आणि मला माहीत आहे की देवानेच माझे रक्षण केले. तुमचा फोन आल्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय. आता मला स्वतःचा अभिमान वाटतोय; याआधी वाटत नव्हता, पण आता वाटतोय. मी तुमच्यासमोर रडतोय त्याबद्दल क्षमस्व," असे ते म्हणाले.
भारतीय जीव घेणारे नसून प्राण वाचवणारे- मोदी
पंतप्रधान मोदींनी स्मित यांना सांगितले की, या घटेनेनंतर देश अभिमानाने सांगू शकतो की भारतीय हे जीव घेणारे नसून, इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे लोक आहेत. तुम्हाला अनेक दुखापती झाल्या होत्या आणि तुम्ही जीवन-मृत्यूच्या संघर्षात होता. पण स्वतःच्या सुरक्षेचा विचार बाजूला सारून तुम्हाला प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी होती. तुम्ही १४० कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. माझ्या अंतःकरणातून मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो," असे मोदी म्हणाले.