नवी दिल्ली : संरक्षण खात्यात तैनात केलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्यासह विनोद कुमार या व्यक्तीला लाचखोरीच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केली आहे. आरोपी शर्मा याच्या पत्नीवरही लाचखोरीचा आरोप आहे. सीबीआयने त्यांच्या घरातून २.२३ कोटी रुपये रोख जप्त केले.
दीपक शर्मा याला बेंगळुरूतील एका कंपनीकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. शर्मा यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापेमारी केली व तेथून २.२३ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
संरक्षण खात्यातील संरक्षण उत्पादन विभागात उपनियोजन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्यावर खासगी संरक्षण कंपन्यांकडून लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. हा अधिकारी दुबईस्थित संरक्षण कंपनी प्रतिनिधी राजीव यादव आणि रवजीत सिंह यांच्या संपर्कात होता. हे दोघे कथितपणे बेंगळुरूमध्ये राहतात आणि कंपनीचे भारतातील कारभार सांभाळतात. यादव आणि सिंह हे शर्मा यांच्या नियमित संपर्कात होते आणि कंपनीसाठी बेकायदेशीर मार्गांनी फायदेशीर निर्णय मिळवण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधत होते.