पावसाच्या व्यत्ययाने विलंबाने सुरू झालेल्या आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित २० षट्कांत चार गडी बाद २०७ धावा केल्या.
शतकवीर रजत पाटीदारने (५४ चेंडूंत नाबाद ११२) धुवाधार फलंदाजी केली. त्याने सात षट्कार आणि १२ चौकार लगावले. त्याने षट्काराने शतक झळकविले. दिनेश कार्तिकने (२३ चेंडूंत नाबाद ३७) त्याला शानदार साथ दिली. विराट कोहली (२४ चेंडूंत २५), महिपाल लोमरोर (९ चेंडूंत १४) यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना मोठ्या खेळी करण्यात अपयश आले. लखनऊ सुपर जायंट्सच्या कृणाल पंड्या, रवी बिश्नाई, मोहसिन खान आणि आवेश खान यानी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस पहिल्याच षट्कात शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरला; परंतु जम बसलेला असतानाच कोहली नवव्या षट्कात बाद झाला. आवेश खानच्या गोलंदाजीवर मोहिसन खानने त्याचा झेल टिपला. ग्लेन मॅक्सवेललाही फार काही करता आले नाही. अवघ्या नऊ धावांवर तो बाद झाला.
त्याआधी, रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे मैदान झाकण्यात आले. पाऊस थांबल्यानंतर नाणेफेक झाली. लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.