छत्तीसगडमधील बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ एका प्रवासी ट्रेनने मालगाडीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की प्रवासी गाडीचा एक डबा थेट मालगाडीच्या एका डब्यावर चढला. मंगळवारी (४ नोव्हेंबर २०२५) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातातील मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून २० जण जखमी आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी (५ नोव्हेंबर २०२५) दिली.
प्रवासी ट्रेनने तोडला 'रेड सिग्नल'
गेवराहून (कोरबा जिल्हा) बिलासपूरकडे येणाऱ्या एमईएमयू (मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) प्रवासी गाडीने मालगाडीला मागून धडक दिली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. “प्रवासी ट्रेनने ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने रेड सिग्नल तोडला आणि मालगाडीला मागून धडक दिली,” अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली. “लाल सिग्नल असूनही लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक वेळेवर का लावला नाही, आणि मालगाडी दृश्यमान अंतरावर असतानाही धडक कशी झाली, याचा तपास होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
अखेरच्या क्षणी उडी मारली अन् जीव वाचला
प्रवासी गाडीचा लोको पायलट विद्या सागर यांचा या अपघातात मृत्यू झाला असून सहाय्यक लोको पायलट रश्मी राज गंभीर जखमी झाली आहे. प्रवासी ट्रेनने मालगाडीच्या ब्रेक व्हॅनला (मालगाडीच्या शेवटच्या डब्याला) इतक्या जोरात धडक दिली की त्याचा जवळपास चुराडा झाला. सुदैवाने मालगाडीच्या व्यवस्थापकाने (गार्ड) शेवटच्या क्षणी ब्रेक व्हॅनमधून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही जखमी रेल्वे कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नुकसानभरपाई जाहीर, दुर्घटनेची सविस्तर चौकशी होणार
रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, “या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.” धडकेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केलं. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करून योग्य वैद्यकीय उपचार दिले जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. जखमी प्रवाशांना बिलासपूरमधील अपोलो हॉस्पिटल आणि छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (CIMS) येथे हलवण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ₹१० लाख, तर गंभीर जखमींना ₹५ लाख आणि किरकोळ जखमींना ₹१ लाख नुकसानभरपाई जाहीर केली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी या घटनेची सविस्तर चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीआरएस) पातळीवर केली जाणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ₹५ लाख आणि जखमींना प्रत्येकी ₹५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.