बलोदाबाजार : छत्तीसगडमधील बलौदाबाजार-भाटापारा जिल्ह्यात बकुलाही येथील ‘रिअल इस्पात’ स्पंज आयर्न कारखान्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोट इतका भयानक होता की, अवघ्या काही सेकंदात फॅक्टरीच्या एका भागात दगडमातीचा ढिगारा साचला. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे फॅक्टरीत काम सुरू होते. मजूर कामात व्यस्त असतानाच अचानक स्पंज आयर्न युनिटमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला. या आवाजाने परिसरातील काही किलोमीटरचा परिसर हादरून गेला. स्फोटानंतर प्लांटमध्ये एकच धावपळ उडाली आणि आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले. आपल्या डोळ्यादेखत सोबती मृत्यूच्या दरीत ओढले जात असल्याचे पाहून मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
बचावकार्य युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच भाटापारा ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी दीपक सोनी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्याची सूत्रे हाती घेतली. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ७ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गंभीर जखमी झालेल्या मजुरांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने बिलासपूरला हलवण्यात आले आहे. अद्यापही काही मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू आहे.
या भीषण स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा गॅस गळतीमुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने संपूर्ण प्लांट परिसर सील केला असून या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. औद्योगिक सुरक्षा विभागाची टीम आता फॅक्टरीमधील सुरक्षा मानकांची तपासणी करणार आहे.