बीजिंग : भारतासोबतच्या सीमावरील तणाव कमी झाल्याचा फायदा घेत अमेरिका-भारत संबंध कमकुवत करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा आरोप करणाऱ्या पेंटागाॅनच्या अहवालावर चीनने गुरुवारी तीव्र आक्षेप नोंदवला. हा अहवाल खोट्या कथनांद्वारे मतभेद पेरण्याचा प्रयत्न असल्याचे चीनने म्हटले.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने काँग्रेसमध्ये सादर केलेल्या अहवालाबाबत विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘पेंटागाॅनचा हा अहवाल चीनच्या संरक्षण धोरणाचे विकृतीकरण करतो. चीन आणि इतर देशांमध्ये फूट पाडतो आणि अमेरिकेची लष्करी वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कारण शोधण्याचा उद्देश ठेवतो. या अहवालाला चीनचा ठाम विरोध आहे. दरम्यान, चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग शियाओगांग यांनीही ‘पेंटागन’च्या अहवालावर टीका केली. या अहवालात संरक्षण व अवकाश अशा क्षेत्रांतील चीन-पाकिस्तान सहकार्याचा तसेच लष्करी तळ उभारण्याच्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिका दरवर्षी असे अहवाल प्रसिद्ध करून चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे झांग यांनी सांगितले.
अमेरिकेच्या अहवालाने चीनच्या राष्ट्रीय संरक्षण धोरणाचे द्वेषपूर्ण पद्धतीने चुकीचे अर्थ लावले असून, चीनच्या लष्करी विकासाबाबत निराधार तर्क-वितर्क केले आहेत आणि चिनी लष्कराच्या नियमित कारवायांची बदनामी केली आहे, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानसोबत चीनच्या वाढत्या संरक्षण सहकार्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.
भारत-चीन संबंधांवरील पेंटागनच्या अहवालाला उत्तर देताना लिन म्हणाले की, चीन भारतासोबतचे संबंध धोरणात्मक उंचीवरून आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहतो. आम्ही भारतासोबत संवाद बळकट करण्यास, परस्पर विश्वास वाढवण्यास, सहकार्याला चालना देण्यास, मतभेद योग्यरीत्या हाताळण्यास आणि सुदृढ व स्थिर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यास तयार आहोत,” असे ते म्हणाले.
अमेरिकेच्या अहवालातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) उल्लेखांबाबत लिन म्हणाले, ‘सीमेचा प्रश्न हा चीन आणि भारत यांच्यातील बाब आहे, आणि सध्याची सीमास्थिती सर्वसाधारणपणे स्थिर असून संवादाची दालने सुरळीत आहेत. संबंधित देशांच्या निराधार व बेजबाबदार टिप्पण्यांना चीन विरोध करतो,” असेही त्यांनी नमूद केले.