PM
राष्ट्रीय

१ फेब्रुवारीपासून सिगारेट, गुटखा महाग; उत्पादन कर वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने सिगारेट आणि तंबाखूशी संबंधित उत्पादनांवर उत्पादन शुल्क वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे. हा नवा नियम १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल.

Swapnil S

नवी दिल्ली : तुम्ही सिगारेट, गुटखा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या १ फेब्रुवारी २०२६ पासून सिगारेट, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ होणार आहे. कारण सरकारने या उत्पादनांवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने सिगारेट आणि तंबाखूशी संबंधित उत्पादनांवर उत्पादन शुल्क वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे. हा नवा नियम १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवरील उपचार खर्च वाढत असल्याने आणि कर चोरी रोखण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सिगारेटवर किती वाढला कर?

नव्या नियमानुसार सिगारेटवर प्रति १००० स्टिक २०५० रुपयांपासून ८५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त कर आकारला जाणार आहे. हा कर सिगारेटची लांबी आणि प्रकारानुसार ठरेल. हा कर आधीपासून लागणाऱ्या जीएसटीव्यतिरिक्त असेल. सध्या सिगारेटवर ४० टक्क्यांपर्यंत जीएसटी लागतो. त्यामुळे एकूण करभार मोठ्या प्रमाणात वाढून त्याचा थेट परिणाम किमतींवर होणार आहे. लांब आणि फिल्टर असलेल्या सिगारेटवर सर्वाधिक परिणाम होईल. वाढलेल्या कराचा भार कंपन्या ग्राहकांवर टाकतील, त्यामुळे दुकानदारांकडे सिगारेटचे दर स्पष्टपणे वाढलेले दिसतील. सरकारने सुमारे सात वर्षांनंतर सिगारेटवरील उत्पादन शुल्क पुन्हा मजबूत केले आहे.

गुटखा आणि खाण्याच्या तंबाखूवरही परिणाम

गुटखा, जर्दा आणि खाण्याच्या तंबाखूवरही नवा कर लागू होईल. सरकारने मशीनच्या क्षमतेनुसार कर आकारण्याचा नियम केला. जितकी पॅकिंगची गती आणि प्रमाण जास्त, तितका कर अधिक भरावा लागेल. या क्षेत्रात करचोरी होत असल्याने हे पाऊल उचलल्याचे सरकारचे म्हणणे आहे.सरकारने तंबाखू उत्पादनांवरील जीएसटी नुकसान भरपाई अधिभार रद्द केला आहे.

नागरिकांना तंबाखू उत्पादनापासून दूर ठेवण्यासाठी निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले की, तंबाखूवरील कर वाढवण्यामागचा उद्देश लोकांना या सवयीपासून दूर ठेवणे हा आहे. किमती वाढल्यास वापर कमी होईल. करातून मिळणारा पैसा राज्यांनाही मिळेल, तसेच अनेक शेतकऱ्यांनी तंबाखूऐवजी इतर पिके स्वीकारल्याचेही त्यांनी नमूद केले.

या निर्णयानंतर सिगारेट आणि गुटखा घेणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. १ फेब्रुवारीपूर्वी कंपन्यांकडे थोडा वेळ आहे, मात्र त्यानंतर बाजारात नवे दर लागू होतील. तुम्ही तंबाखूजन्य पदार्थ वापरत असाल, तर येत्या काळात खिशावर त्याचा परिणाम स्पष्टपणे जाणवेल.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी

Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं

मीरा-भाईंदरमध्ये आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा अखेर दाखल; भाजप पदाधिकाऱ्यांची नावे जाणीवपूर्वक टाळल्याचा गंभीर आरोप

पुण्यात युतीबाबत अजित पवार-शिवसेनेचे संकेत; महायुतीतील पेच सोडवण्यासाठी हालचाली

महायुतीचे २२ बिनविरोध; भाजपच्या सर्वाधिक १२, तर शिंदे सेनेच्या ७ उमेदवारांना लाॅटरी; अर्ज छाननीत विराेधकांना फटका