‘विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, पॅलेट गनच्या वापराचे आदेश कोणी दिले, या प्रश्नांची उत्तरे देशाला हवी आहेत. गृहमंत्री अमित शहा हे त्याचे उत्तर देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा’, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.
केंद्र सरकारकडून राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक २०२६ मांडले. या विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खरगे यांनी हल्लाबोल केला. पेपर चोरणारे वाचले, मेहनत करणारे मार खात राहिले, हा कसला न्याय. ही कसली पद्धत, असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
सरकारने जे विधेयक आणलेय त्यात आकडेवारी बदलली आहे, त्यातून काही होणार नाही. जादा दंड, कठोर शिक्षा, स्पेशल टास्क फोर्स, फास्ट ट्रॅक कोर्ट यासारख्या गोष्टींचा उल्लेख त्यात आहे, त्यामुळे काही फरक पडणार नाही, पेपरफुटी कशी रोखणार हे सरकारने सांगायला पाहिजे होते, असे खरगे म्हणाले.
दिल्लीत इतकी गडबड होऊन देखील गृहमंत्री काही बोलत नाहीत, तोंड शिवलेय का कोणी, देशाच्या भल्यासाठी बोलावे लागते. अपमान सहन करावा लागतो, अशा शब्दात मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.