जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल (Photo-X)
राष्ट्रीय

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

सीजेपीचे कार्यकर्ते गावात पोहोचण्यापूर्वीच मुख्य रस्ता अडवण्यात आला होता. परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणीही केली जात होती...

किशोरी घायवट-उबाळे

राजस्थान : जयपूर येथील बगरू विधानसभा क्षेत्रातील रामपुरा-कंवरपुरा गावात शुक्रवारी (दि. २१) आशुतोष रांका आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या CJP कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

शाळेच्या पाहणीला गेलेल्या पथकाला अडवल्याचा दावा

सीजेपीचे कार्यकर्ते 'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गावात गेले होते. शाळेतील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयींची पाहणी करण्याबरोबरच शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा उद्देश होता.

माहितीनुसार, सीजेपीचे कार्यकर्ते गावात पोहोचण्यापूर्वीच मुख्य रस्ता अडवण्यात आला होता. परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणीही केली जात असल्याचे सांगण्यात आले. यानंतर ग्रामस्थ आणि सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पथकाला गावाबाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले.

शाळेबाहेर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

घटनेनंतर ग्रामस्थांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी सीजेपीविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, बगरूचे पोलीस उपअधीक्षक धर्मेंद्र शर्मा यांनी अशा कोणत्याही घटनेची माहिती नसल्याचे सांगितले.

आशुतोष रांका यांच्यासह कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सहसंयोजक आशुतोष रांका यांच्यासह कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप केला. कारच्या काचा फुटल्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

रांका यांनी या घटनेत सहभागी झालेले स्थानिक ग्रामस्थ नसून भाजपकडून तेथे आणण्यात आले होते, असा आरोप केला. मात्र, या आरोपांनाही पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

शाळेचे वर्ग जनावरांच्या गोठ्यात

रामपुरा कंवरपुरा येथील सरकारी शाळेची इमारत असुरक्षित घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत बंद आहे.

सीजेपीच्या म्हणण्यानुसार, सध्या जवळील जनावरांच्या गोठ्यात विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठीच पथक तेथे गेले होते, असे रांका यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्त्यांनी शाळेची इमारत स्थानिक पातळीवर दुरुस्त करता येऊ शकते, असा दावा केला. तसेच दुरुस्तीसाठी सरकारने आधीच निधी मंजूर केल्याचेही त्यांनी म्हटले.

शुक्रवारची ही भेट सीजेपीच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाचा भाग होती. पक्षाने जयपूर जिल्ह्यातील दोन सरकारी शाळांची पाहणी करण्याचे नियोजन केले होते. या अभियानांतर्गत सीजेपीची पथके शाळांच्या इमारती, पायाभूत सुविधा, शैक्षणिक व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयींचा आढावा घेत आहेत. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत.

शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावरून वाद

राजस्थानमधील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधींच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे हे अभियान सुरू आहे. सीजेपीने यापूर्वी केलेल्या शाळा पाहणीनंतर राज्याच्या शिक्षण विभागाने ठोस कारण नसताना बाहेरील व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधींना सरकारी शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, असे निर्बंध घातल्याचे सांगण्यात येत आहे.

'अभियान सुरूच राहील'

सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी या निर्बंधांवरही टीका केली. राजस्थानमधील सरकारी शाळांची खराब अवस्था लपवण्यासाठी शिक्षणमंत्री हुकूमशाही पद्धतीचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

"सरकारच्या आदेशामुळे आम्ही घाबरणार नाही. राजस्थानमधील सर्व सरकारी शाळांची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत आमचे अभियान सुरूच राहील," असे रांका यांनी सांगितले.

'भाजपचे गुंड सीजेपी कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहेत'

अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे भाजपवर गंभीर आरोप केले. "राजस्थानमध्ये नेमकं काय चाललंय?" असा सवाल करत त्यांनी भाजपचे गुंड सीजेपीच्या स्वयंसेवकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी ही घटना घडू कशी दिली, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

रांका यांनीही स्वतंत्र पोस्टमध्ये या घटनेत सहभागी झालेले पुरुष स्थानिक रहिवासी नसल्याचा दावा केला. भाजपने त्यांना तेथे आणल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, सीजेपीने केलेल्या या आरोपांवर पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

'आम्ही Gen Z...' म्हणत सैनिकांशी वाद घालणाऱ्या 'त्या' तरुणीने मागितली माफी; म्हणाली, "रागाच्या भरात चुकीचे बोलले"

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी