नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) आणि हजारो संतप्त तरुणांच्या 'चलो संसद' आंदोलनामुळे मध्य दिल्लीत अभूतपूर्व संग्राम झाला. नीट परीक्षांमधील घोटाळे आणि पेपरफुटीविरोधात संसद भवनाकडे जाणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या चकमकीत ५० हून अधिक पोलीस व आंदोलक जखमी झाले असून मध्य दिल्लीतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या मुद्द्यावरून विरोधकांनीही संसदेत हंगामा केला. दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.
कॉकरोच जनता पार्टी व अन्य पक्षसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी संसदेवर मोर्चा काढलेला मोर्चा अपेक्षेनुसार वादळी ठरला. गेले महिनाभर जंतरमंतरवर धरणे देणारे आंदोलक आणि आजच्या मोर्चासाठी देशभरातून आलेले या मैदानाच्या बाहेर कूच केल्यावर हजारो पोलिस व सुरक्षा दलांच्या जवानांशी त्यांचा मुकाबला झाला. मोर्चामध्ये खासदार चंद्रशेखर आझाद, महुआ मोईत्रा, शबाना आजमी, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. जंतरमंततर येथील आंदोलनानंतर दुपारी सव्वाअकराच्या सुमारास हजारो आंदोलक संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळील मुख्य बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने निघाले. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'इन्कलाब जिंदाबाद' अशा घोषणा ते देत होते.
या मोर्चाला पोलिसांची परवानगी नव्हती. तसेच संसद अधिवेशन चालू असल्याने या भागात जमावबंदी व इतर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे संघर्ष होणार हे अटळ होते. त्यानुसार, पोलिसांनी संसद मार्ग तसेच सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक २ जवळ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या चकमकीत काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने अनेक पोलीस व आंदोलक जखमी झाले. तर पोलिसांनीच आपल्यावर दगडफेक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नवी दिल्ली परिसरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी तात्पुरती बंद करण्यात आली होती.
सफदरजंग रुग्णालयातून जारी केलेल्या एका हस्तलिखित निवेदनात वांगचुक म्हणाले, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर ज्या प्रकारे बळाचा वापर करण्यात आला, ते पाहून मी माझे उपोषण पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत तरुण नेत्यांना संसद भवनात खासदारांशी भेटू दिले जात नाही किंवा मला रुग्णालयात त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत माझे हे उपोषण असेच सुरू राहील. त्याचबरोबर, "या कारवाईपूर्वी सरकार शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करेल, अशी अपेक्षा आहे," असेही त्यांनी पुढे नमूद केले.
दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण आणि राम मंदिर देणगी चोरीच्या कथित मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. विरोधकांच्या घोषणाबाजी आणि गोंधळामुळे वारंवार तहकुबीनंतर शेवटी सोमवारी दिवसभरासाठी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.
मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद
मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार’ अशा शब्दात संजय राऊतांनी टोला लगावला आहे. दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याचे सारे श्रेय हे फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जात आहे. त्यांनी देशातील मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल त्यांचे आभार, अशा शब्दात संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
उपोषण सुरूच ठेवण्याचा वांगचुक यांचा इशारा
सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असलेले सोनम वांगचुक यांनी, युवा नेत्यांना संसदेत खासदारांना भेटू दिले जात नाही किंवा खासदार रुग्णालयात येत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा दिला आहे. सीजेपीच्या 'संसद चलो' मोर्चादरम्यान शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या तरुणांवर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा सोमवारी केली.
प्रधान-शहा भेट
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट संसद भवन परिसरातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयात झाली. मात्र, या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील अधिकृतपणे समोर आलेला नाही.
मोदी सर्वाधिक युवाविरोधी- राहुल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त युथविरोधी (युवकविरोधी) पंतप्रधान असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. १५२ पेपर फुटले, ७.५ कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान; शिक्षा मात्र प्रामाणिक तरुणांनाच, एकाही दोषीवर कारवाई झालेली नाही. मग शिक्षा कोणाला मिळाली तर रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या प्रामाणिक तरुणांना, अशी टीकाही त्यांनी केली. पोलीस व प्रशासनाकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि अटकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्णपणे 'रास्त आणि न्याय्य' असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शवला आहे.
सरकारशी पहिली चर्चा
सोमवारच्या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी जंतरमंतरवर दिल्ली व आसपासच्या भागातून रविवारीच मोठ्या संख्येने तरुण जमा झाले.
परिस्थितीचा अंदाज घेऊन दिल्ली पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा कॉकरोच जनता पार्टीशी संपर्क केला व सरकारशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला.
सोमवारी सकाळी सहा वाजता जे. पी. नड्डा यांच्यासमवेत बैठक करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
त्यानुसार सकाळी सीजेपीचे दोन प्रवक्ते सौरव दास व आशुतोष रांका नड्डा यांना भेटण्यास गेले. मात्र त्यांना दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले.
अखेर दुपारी अडीचच्या सुमारास भेट पार पडली. ती केवळ दहा मिनिटे चालली. त्यात कॉकरोच पार्टीच्या वतीने तीन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वांगचुक यांची त्वरित सुटका करावी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशा तीन मागण्या त्यात करण्यात आल्या.
आंदोलकांनी पहिल्यांदाच सरकारशी चर्चेचा प्रस्ताव दिला. सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली असून आंदोलकांनी आंदोलन मागे घेऊन शांतता प्रस्थापित करावी, अशी विनंती मी केली आहे, असे नड्डा यांनी नंतर सांगितले.
गोंधळापेक्षा तथ्य आणि तर्काने चर्चा होणे गरजेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व सदस्यांना सभागृहात अर्थपूर्ण आणि फलदायी चर्चा करण्याचे आवाहन केले. सभागृहातील चर्चा जर तथ्य आणि तर्कावर आधारित असेल, तर तेथे गोंधळ घालण्याची किंवा आवाज चढवण्याची गरजच उरणार नाही, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पावसाप्रमाणेच पावसाळी अधिवेशनही उत्पादक ठरावे. ऋतुमानातील पाऊस असो किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन, दोन्ही सक्रिय राहिल्यास देशासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. असे सांगत पंतप्रधान म्हणाले, "जेव्हा पाऊस आणि अधिवेशन दोन्ही सक्रिय व उत्पादक असतात, तेव्हा देशाचे आणि देशवासीयांचे कल्याण होते. त्यामुळे पाऊसही चांगला व्हावा आणि संसदेचे हे अधिवेशनही तितकेच कामकाजपूर्ण व यशस्वी व्हावे, अशीच आपली प्रार्थना आहे, असे ते म्हणाले.