नवी दिल्ली : सरकारने नववर्षाची सुरुवात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून केली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी १९ किलो व्यापारी गॅस सिलिंडरच्या दरात प्रतिसिलिंडर दीड रुपया घट करण्यात आली आहे. महिन्याभरात गॅस सिलिंडरचे दर दुसऱ्यांदा कमी झाले आहेत. मात्र घरगुती वापराच्या १४ किलो वजनी एलपीजी सिलिंडरच्या दरात सरकारने कोणताही बदल केलेला नाही.
सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (आयओसी), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे.
प्रमुख शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरचे नवे दर
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर सोमवारी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १७५५.५० रुपये झाली आहे. याआधी हा दर १७५७ रुपये रुपये होता. त्यामुळे दिल्लीत दर दीड रुपयांनी कमी झाले आहेत. चेन्नईमध्ये एलपीजीच्या किमतीत सर्वाधिक ४.५० रुपयांची कपात करण्यात आली असून १९ किलोचा सिलिंडर आता १९२४.५० रुपयांना मिळेल. मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर १.५० रुपयांनी घसरून १७०८.५० रुपये झाला आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ५० पैशांनी वाढली असून आज दर १८६९ रुपये आहे.
१ जानेवारी रोजी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला असला, तरी १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या चार महिन्यांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी ३० ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल करण्यात आला होता, त्यानंतर सिलिंडरचे दर कायम आहेत. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा भाव ९०२.५० रुपये, तर दिल्लीमध्ये ९०३ रुपये आहे. त्यासोबतच चेन्नईमध्ये ९१८.५० आणि कोलकातामध्ये ९२९ रुपये आहे.