राष्ट्रीय

चंपाई सोरेन यांना विश्वासमत, झारखंड विधानसभेत ४७ विरुद्ध २९ मतांनी विजय, हेमंत सोरेन यांची उपस्थिती

झारखंड विधानसभेत सोमवारी नवीन सरकारविषयी मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाप्रणीत (जेएमएम) आघाडीने ४७ विरुद्ध २९ अशा मताधिक्याने जिंकला.

Swapnil S

रांची : झारखंड विधानसभेत सोमवारी नवीन सरकारविषयी मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाप्रणीत (जेएमएम) आघाडीने ४७ विरुद्ध २९ अशा मताधिक्याने जिंकला. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेले माजी मुख्यमंत्री आणि जेएमएमचे नेते हेमंत सोरेन हेदेखील विशेष न्यायालयाने परवानगी दिल्याने ठरावाच्या कामकाजासाठी सभागृहात उपस्थित होते.

काळा पैसा चलनात आणणे (मनी लाँड्रिंग) आणि जमिनीचे गैरव्यवहार आदी प्रकरणांत ईडीने हेमंत सोरेन यांना गेल्या आठवड्यात अटक केल्याने त्यांच्या जागी चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. या नवीन सरकारवरच्या विश्वासदर्शक ठरावासाठी झारखंड विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मतदानासाठी जेएमएम आमदारांना खास हैदराबादहून विशेष सुरक्षेत आणण्यात आले. सरकारच्या बाजूच्या पक्षांनी त्यांच्या आमदारांना ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा व्हिप काढला होता.

झारखंड विधानसभेत एकूण ८१ सदस्य आहेत. त्यापैकी गाण्डेय मतदारसंघाचे जेएमएमचे आमदार सरफराज अहमद यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनतील, अशी अटकळ होती. त्यांच्यासाठी ही जागा रिकामी करण्यात आली होती. बाकी ८० आमदारांपैकी जेएमएमचे रामदास सोरेन, भारतीय जनता पक्षाचे इंदरजीत महातो आणि अपक्ष आमदार अमित महातो हे तिघे मतदानाला अनुपस्थित होते. उर्वरित ७७ आमदार विश्वासदर्शक ठरावासाठी सभागृहात उपस्थित होते. त्यापैकी अपक्ष आमदार सरयू रॉय यांनी मतदानात भाग घेतला नाही. मतदानात भाग घेतलेल्या ७६ आमदारांपैकी ४७ मते चंपाई सोरेन यांच्या सरकारला मिळाली आणि विरोधी पक्षांना २९ मते मिळाली.

आता नवीन मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यापुढे राज्याचा अर्थसंकल्प सादर करून मंजूर करण्याचे आव्हान आहे, तर सरफराज अहमद यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या गाण्डेय मतदारसंघातील जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक घेतली जाणार का नाही, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची भेट घेतली आहे.

अटकेत राजभवनाचा हात -हेमंत सोरेन

ईडीने अटक केलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन विशेष न्यायालयाच्या परवानगीनुसार सभागृहात हजर झाल्यानंतर जेएमएम आमदारांनी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. हेमंत सोरेन यांच्यावर पत्रकारांशी किंवा अन्य कोणाशी बोलण्याची बंदी होती. त्यांनी सभागृहात भाषण करून मतदानात भाग घेतला. 'भारताच्या इतिहासात ३१ जानेवारी हा काळा दिवस आहे. माझ्या अटकेत राजभवनाचा हात आहे. भाजपने माझ्यावरील आरोप सिद्ध कारावेत, असे मी त्यांना आव्हान देतो. माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन', असे हेमंत सोरेन यावेळी म्हणाले. दरम्यान, हेमंत सोरेन यांनी ईडीविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

झारखंड विधानसभा बलाबल

एकूण जागा - ८१

राजीनाम्यामुळे रिक्त जागा - १

अनुपस्थित आमदार - ३

मतदानात सहभाग नाही - १

मतदानात सहभागी आमदार - ७६

सरकारच्या बाजूने मते - ४७

जेएमएम - २७

काँग्रेस - १७

आरजेडी - १

जेव्हीएम - १

सीपीआय-एमएल - १

नामनिर्देशित - १

सरकारविरोधी

मते - २९

भाजप - २५

एजेएसयू - ३

एनसीपी - १

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी