राष्ट्रीय

आयसीयूत भरतीसाठी रुग्ण, नातेवाईकांची संमती सक्तीची,केंद्र सरकारची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

Swapnil S

स्वप्नील मिश्रा/मुंबई

रुग्णाला आयसीयूमध्ये (अतिदक्षता विभागात) दाखल केल्यानंतर रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची घालमेल होत असते. आता आयसीयूत भरती करण्यापूर्वी रुग्ण, नातेवाईकांची संमती सक्तीची करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्वे केंद्राने जारी केली असून देशातील सर्व रुग्णालयांना ती बंधनकारक केली आहेत.

कोविड काळात गरज नसतानाही अनेक रुग्णांना आयसीयूत भरती केले होते. त्यावेळी खूप मोठा गदारोळ माजला होता. आता रुग्णाला अतिदक्षता विभागात भरती करताना त्याची व त्यांच्या कुटुंबाची संमती आवश्यक ठरणार आहे. तसेच आयसीयूत काम करणाऱ्या डॉक्टरांनाही विशेष पात्रता लागणार आहे, असे मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे. आयसीयूत काम करणारा डॉक्टर हा इंटर्नल मेडिसीन, भूलशास्त्र तज्ज्ञ, आपात्कालिन मेडिसीन, जनरल सर्जरी, पुल्मोनरी मेडिसीनमधील पदव्युत्तर पदवी घेणारा असला पाहिजे.

खासगी रुग्णालयातील नामवंत आयसीयू तज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही रुग्णाला थेट आयसीयूत दाखल करत नाही. पण, रुग्णांची परिस्थिती इतकी बिकट असते की त्याला आयसीयूत दाखल करून स्थिर करण्याचाच पर्याय असतो. सरकार जी धोरणे आखते किंवा नियम आखते, त्याचे पालन रुग्णालये करतात. परंतु कधीकधी अशी परिस्थिती असते की रुग्णांना वॉर्डमध्ये नव्हे तर केवळ आयसीयूमध्ये स्थिर केले जाऊ शकते. ते निर्णय रुग्णाच्या परिस्थितीवर अवलंबून असते, असे ते म्हणाले. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीनचे माजी अध्यक्ष डॉ. कपिल झिरपे व इतर तज्ज्ञ हे तज्ञ समितीचा भाग होते. ज्यांनी २०२० मध्ये इंडियन जर्नल ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये आयसीयू नियोजनावर एकमत व्यक्त केले होते. केंद्राने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी आमच्या संशोधनाचा संदर्भ दिला आहे. याशिवाय मार्गदर्शक तत्त्वे आयसीयू संसाधनांच्या योग्य वापरास प्राधान्य दिले. अंतिम टप्प्यात किंवा गंभीर आजारी रुग्णांना प्रवेश टाळणे, कार्यक्षम आरोग्य सेवा संसाधन वाटप करणे आदी बाबींचा त्यात समावेश होता. आयसीयूत भरती करताना रुग्ण हे बेशुद्ध अवस्थेत असतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतो. रुग्णांना विशेष काळजीची गरज असते. भारत हा मोठा बहुविविधता असलेला देश आहे. देशातील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये आयसीयू सुविधाबाबत सर्वंकषता नाही. नवीन मार्गदर्शक तत्वांमुळे आयसीयू तज्ज्ञ व त्यांच्या जबाबदारी निश्चीत केल्या जातील. आयसीयूत भरती व डिस्चार्ज याबाबत निकष तयार केले जातील.

कोविड काळात आयसीयू किंवा ऑक्सीजन बेड ज्यांना आवश्यक नव्हता, त्यांनाही आयसीयूत भरती केले होते. रुग्णाला आयसीयूत भरती करून त्याच्याकडून जास्त पैसे उकळले जात होते, त्यामुळे केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांची गरज होतीच, असे आरोग्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त