नवी दिल्ली : देशात खोकल्याच्या सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारच्या औषध नियामक संस्थेने (सीडीएससीओ) देशभरात खोकल्याच्या सिरप उत्पादक कंपन्यांची चाचणी, तपासणी आणि लेखापरीक्षण करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी गुरुवारी सांगितले.
औषध नियामक संस्थेने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या हद्दीतील खोकल्याच्या सिरप उत्पादक कंपन्यांची यादी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यावर ऑडिट प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ही कारवाई दूषित खोकल्याच्या सिरपचे सेवन केल्याने लहान मुलांच्या मृत्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
सूत्रांच्या मते, औषध उत्पादक कंपन्यांसाठी सुरक्षा आणि दर्जा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणत्याही राज्याने अद्याप पूर्ण पालन केलेले नाही. सध्या १८ राज्य औषध नियंत्रण प्राधिकरणांनी या प्रणालीवर नोंदणी केली आहे. ही प्रणाली औषध परवाना प्रक्रिया आणि नियामक अनुपालन सुलभ करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
‘ओएनडीएलएस’ हे औषध-संबंधित विविध परवाने प्रक्रिया करण्यासाठी एक डिजिटल, सिंगल-विंडो प्लॅटफॉर्म आहे. ते ‘सी-डॅक’ आणि औषध नियामक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे.
दरम्यान, औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडियाने काल सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील औषध नियंत्रकांना सल्ला देताना सांगितले की, औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची आणि तयार झालेल्या औषधांच्या नमुन्यांची बाजारात विक्रीपूर्वी तपासणी करावी. हे आवाहन मध्य प्रदेशातील दूषित खोकल्याच्या सिरपच्या सेवनामुळे झालेल्या मुलांच्या मृत्यू प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे.
काही कंपन्यांकडून निकषांचे उल्लंघन
अलीकडील तपासण्यांदरम्यान काही उत्पादक कंपन्या त्यांच्या वापरातील पूरक घटक आणि सक्रिय घटक यांच्या प्रत्येक बॅचची नियमानुसार चाचणी करत नाहीत, असे आढळून आले. अलीकडेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे दूषित खोकल्याच्या सिरपमुळे अनेक मुलांचे मृत्यू झाले. या पार्श्वभूमीवर औषधांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून काही सूचना सरकारने जारी केल्या आहेत.